Join us  

अविस्मरणीय मैफल!

By admin | Published: September 18, 2016 4:49 AM

मी कथ्थक नृत्याच्या बाबतीत कदाचित जाणती झाले तोवर रोहिणीतार्इंची साधना चार तपांहून जास्त झाली होती

कलाकारांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की, अनेक कार्यक्रम उत्तम होतात, पण एखादा दिवस असा येतो की काही तरी नेहमीपेक्षा वेगळं अदभुत, सध्याच्या भाषेत बोलायचं झालं तर ‘भन्नाट’ आणि कलेच्या भाषेतून बोलायचं झालं तर काही तरी ‘दैवी’ घडून जातं आणि ती कलाकृती आपल्या कायमची स्मरणात राहते. त्यातून मिळणारा रसानुभव आणि आनंद हा शब्दात मांडता येत नाही. तो केवळ त्या क्षणी जगायचा अनुभव असतो. पण मी जेव्हा माझ्या गुरू पंडिता रोहिणी भाटे यांच्या मैफलींचा विचार करते तेव्हा मला ही अनुभूती प्रत्येक मैफलीतच जाणवते. मी कथ्थक नृत्याच्या बाबतीत कदाचित जाणती झाले तोवर रोहिणीतार्इंची साधना चार तपांहून जास्त झाली होती. त्यांच्या नसानसात, प्रत्येक श्वासात कथ्थक नृत्यशैली इतकी भिनली होती की या तपश्चर्येची झळाळी, तेज त्यांच्या प्रत्येकच कलाकृतीला अदभुततेने नटवत होतं. पण तरीही उल्लेख करायचा आणि एखादीच नृत्याची मैफल सांगायची तर त्यांच्या पासष्टीनिमित्त केलेली स्नेहसदन सभागृहातील त्यांची मैफल. पासष्टाव्या वर्षी साधारणत: काठीचा आधार घेऊन चालणाऱ्या सर्वांना अचंबित करेल आणि पंचविशीतल्या नृत्यांगनांनाही ओशाळायला होईल असं चैतन्य, सळसळती ऊर्जा आणि राजस, लोभस देखणं व्यक्तिमत्त्व म्हणजे रोहिणीताई! पुण्याच्या नारायणपेठ येथील स्नेहसदनचं दालन खचाखच भरलेलं होतं. रसिक आतुरतेने वाट पाहत होते आणि पांढऱ्या शुभ्र साडीमध्ये रोहिणीताई डौलदार चाल करून माइकजवळ आल्या. अतिशय विनम्रपणे रसिकांना अभिवादन करून मैफलीची सुरुवात त्यांनी एका वेगळ्याच वंदनेने केली. वृंदावने मन मिलिंद... हे एखाद्या देवी किंवा देवतेचे वर्णन नसून या वंदनेत वर्णन होते ते कृष्णाच्या अस्तित्वामुळे प्रसन्न झालेल्या वृंदावनातील वातावरणाचे. आपल्या अदाकारीने आणि सात्विकतेने परिपूर्ण अशा अभिनयाने रोहिणीतार्इंनी वृंदावनच रसिकांसमोर उभं केलं आणि त्यानंतर प्रस्तुत केलेला साडेदहा मात्रांचा ‘चित्ररूपक’ हा ताल म्हणजे जणूकाही या वृंदावनात नृत्यविलास करणाऱ्या श्रीकृष्णाचेच मोहक रूप दाखवत होता. स्वच्छ शब्दोच्चार असलेली अप्रतिम पढन्त, लयीवरील पकड, या वयातही थक्क करायला लावणारे पदन्यास आणि रसिकांशी आपल्या बुद्धिमत्तेने वाक्चातुर्याने साधलेला संवाद त्यामुळे हा ताल प्रचलित तालांमधला नसूनही लोकांना आपलासा वाटला. ऊर्जा आणि चैतन्याचा उत्सव असणाऱ्या या रचनेनंतर त्यांनी ‘मुग्धा’ ही नायिका सादर केली. ‘मुग्धा’ म्हणजे टीनएजर, धड लहान नाही आणि ना धड मोठं अस मधलंच अल्लड वय. पण या अल्लड वयातला निरागस भाव नुसत्या डोळ्यांमधून रोहिणीतार्इंनी इतका सशक्तपणे उभा केला की ६५ वर्षांची ही नृत्यांगना १६ वर्षांचीच भासू लागली. त्यानंतर केलेली माखनचोरी म्हणजे कार्यक्रमाचा सर्वोच्च बिंदू होता. ताक घुसळून लोणी काढताना दाखवलेले बारीक बारीक तपशील, बाळकृष्णाच्या चेहऱ्यावरील मिश्कील भाव आणि शेवटचा यशोदेचा लटका राग, त्याला लोणी भरवणं सगळंच बेमालूम! मैफलीची सांगता ज्ञानेश्वरांच्या विरहिणीने केली. ‘धनु वाजे रुणझुण... आत्ममग्न करायला लावणारी, हुरहुर लावणारी ही रचना... दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले हे सादर करताना चेहऱ्यावर उमटलेले ते भाव आठवले की आजही अंगावर रोमांच उभे राहतात आणि परमेश्वराच्या दर्शनाला आसुसलेला भक्त साकारताना खरोखरच सिद्धीला पोहोचलेल्या या कलाकाराने रसिकांचे डोळे कधी ओले केले हे कोणालाच कळले नाही. कार्यक्रम संपला तेव्हा टाळ्यांचा कडकडाट आणि डोळ्यातून अश्रूधारा आणि उभं राहून मानवंदना असा रसिकांचा त्रिवेणी आविष्कार बघायला मिळाला. रोहिणीतार्इंना तितकीच समर्पक साथ करणाऱ्या पं. अरविंद कुमार आझाद (तबला), प्रसन्न राजवाडे (हार्मोनियम), डॉ. माधुरी जोशी (गायन) आणि अजित सोमण (बासरी) या सर्व कलाकारांचेही भरपूर कौतुक झाले.(लेखिका प्रसिद्ध नृत्यांगना आहेत.)>रोहिणीताई नेहमी म्हणायच्या लोकांसाठी, रसिकांसाठी चेहऱ्यावर हास्य आणून नृत्य करणं म्हणजे खोटं खोटं, वरवरचं नृत्य करणं, पण कलाकाराच्या आत दिवा लागणं महत्त्वाचं. त्यातून जो चेहऱ्यावर प्रकाश येतो त्या प्रसन्नतेने दिसणारा चेहरा लोकांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहतो. आजही रोहिणीतार्इंच्या मैफली स्मरताना सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो तो त्यांचा प्रसन्न, तेजस्वी, नृत्याच्या प्रतिभेने उजळलेला आणि फक्त डोळ्यातूनही सारं काही व्यक्त करणारा चेहरा!