Join us

#MeToo: सिनेसृष्टीत महिलांचे लैंगिक शोषण ही दुर्दैवी बाब - जॅकी श्रॉफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 5:51 AM

सिनेसृष्टीत महिलांचे लैंगिक शोषण होत आहे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.

मुंबई : सिनेसृष्टीत महिलांचे लैंगिक शोषण होत आहे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. मात्र एकमेकांची उणीदुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणणे ही गोष्ट चांगली नाही, असे मत अभिनेता जॅकी श्रॉफने मी टू मोहिमेबद्दल बोलताना व्यक्त केले. बॉलीवूडमधील भांडणे अशी सर्वांसमोर येणे आणि त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा करत राहणे अतिशय दुर्दैवी आहे. सोशल मीडियावर लोक मूळ गोष्ट सोडून फक्त याचा आनंद घेत आहेत, असेही जॅकी श्रॉफ म्हणाला.मुंबईत गुरुवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना जॅकीने मी टू मोहिमेबद्दल आपले मत स्पष्टपणे व्यक्त केले. काम करण्याच्या जागी महिलांचे शोषण होणे ही बाब चांगली नाही, त्याचे कधीही समर्थन होऊ शकत नाही. जर असे काही प्रकरण समोर आले तर त्याविरोधात कठोर कारवाई केली गेलीच पाहिजे. लैंगिक शोषण होत असेल तर ते सहन करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आपल्या सगळ्यांची जबाबदारी ही आहे की आपल्याला महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करावे लागेल, असेही जॅकी श्रॉफने म्हटले आहे.तर दुसरीकडे अभिनेत्री दिव्या दत्तानेही हे सगळे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात कदाचित आणखी नावेही समोर येऊ शकतात. महिला पुढे येऊन बोलत आहेत ही चांगली गोष्ट आहे, असेही दिव्या दत्ताने म्हटले आहे.

टॅग्स :मीटू