- राज चिंचणकर
मराठी चित्रपट : ‘पोश्टर गर्ल’ऋषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव, जितेंद्र जोशी, आनंद इंगळे, हेमंत ढोमे, वैभव मांगले, जयवंत वाडकर, संदीप पाठक, सिद्धार्थ मेनन अशी स्टारकास्ट एकत्र आल्यावर जो काही धुमाकूळ अपेक्षित आहे, तो ‘पोश्टर गर्ल’ या चित्रपटाने अचूक घातला आहे. या चित्रपटाच्या नावात जरी ‘गर्ल’ असली, तरी यातल्या ‘बाप्या’ मंडळींनीच हे ‘पोश्टर’ खऱ्या अर्थाने रंगवले आहे. या चित्रपटात मांडलेली रसाळ गोष्ट खुसखुशीत, चटकदार आणि खमंग भेळीचा आस्वाद देणारी आहे.एखादी मुलगी नावालाही सापडणार नाही, अशी अवस्था या चित्रपटातल्या टेकवडे गावाची झाली आहे. आता हे तसे का आणि कसे, असे प्रश्न विचारायचे नाहीत; कारण ती गोष्टच तशी आहे. गावात एकही मुलगी नसल्याने, इथल्या ‘बाप्या’ मंडळींची पार गोची झाली आहे. त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवून घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. या तहानेत अधिकच वाढ व्हावी, अशी घटना आता इथे घडली आहे. रूपाली ही तरुणी तिच्या वडिलांच्या श्राद्धासाठी या गावात राहणाऱ्या तिच्या किसन काकाकडे आली आहे. तिच्या इथे येण्याने वाळवंटात अचानक पाणी सापडावे, अशी गत गावातल्या तमाम पुरुषांची झाली आहे. तिच्याशी लग्न करण्यासाठी इथल्या मंडळींमध्ये स्पर्धा लागली आहे. ही बाब लक्षात आल्यावर रूपाली आणि तिच्या काकाच्या डोक्यात भन्नाट कल्पना येतात आणि त्यानंतर जी काही गंमत उडते, त्याचे सादरीकरण म्हणजे हा चित्रपट आहे.अस्सल गावरान थाटात आणि इरसाल पद्धतीने हेमंत ढोमे याने या चित्रपटाची कथा, पटकथा तसेच संवाद लिहिले आहेत आणि हेच या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कागदावरच ही गोष्ट ताकदीने उतरली आहे आणि दिग्दर्शक समीर पाटील यांनी त्यावर ‘दे धमाल’ रंगकाम केले आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेची वेगळी ओळख ठसावी म्हणून त्या त्या व्यक्तिरेखेला त्यांनी दिलेल्या लकबी भन्नाट आहेत. यात पेरलेल्या प्रसंगांची लज्जतही काही औरच आहे. मजा व मस्तीसोबत स्त्री-भ्रूणहत्येसंबंधी सामाजिक संदेशही या चित्रपटातून देण्यात आला आहे आणि तोही तितकाच महत्त्वाचा आहे. मात्र गावात आतापर्यंत स्त्री-भ्रूणहत्या होत असल्याचा संदर्भ फारच सहजपणे येतो. वास्तविक, त्यातले गांभीर्य ठोसपणे जाणवून देण्याची आवश्यकता होती. पण यावर चित्रपटाच्या मांडणीने पांघरूण घातले आहे आणि हास्यरसाला अधिक प्राधान्य दिले आहे. यातली गाणी चांगली वाजली आहेत.या चित्रपटात भूमिका करणाऱ्या कलावंतांनी तर या सगळ्यावर कळस चढवला आहे. यातला ऋषिकेशचा किसन काका असो, जितेंद्र्रचा उपसरपंच असो, अनिकेतने घेतलेले बावळटपणाचे सोंग असो, वैभव मांगले आणि सिद्धार्थ मेनन यांचे सतत ‘टाईट’ राहणे असो, आनंद इंगळेचा रंगेलपणा असो किंवा संदीप पाठक व अक्षय टंकसाळे या जुळ्या भावंडांची नखरेल जोडी असो; यातल्या प्रत्येकाच्या वाट्याला धमाल भूमिका आल्या आहेत आणि त्यांनी त्या तशाच धमाल पद्धतीने रंगवल्या आहेत. यातली हेमंत ढोमेची भूमिकाही अगदी वेगळी आहे. सोनाली कुलकर्णीने ‘पोश्टर गर्ल’ची मध्यवर्ती भूमिका सहज अभिनयाने तोलून धरली आहे. कलावंत तेच; मात्र त्यांचा आतापर्यंत न पाहिलेला अंदाज अनुभवत पैसा वसूल झाल्याचे समाधान मिळवायचे असेल, तर या ‘पोश्टर गर्ल’ची वारी करणे भाग आहे.