फॅशन फोटोग्राफीमध्ये 'बंटी-प्रशांत' या नावाला विशेष ग्लॅमर आहे. गेल्या १५ वर्षांत फॅशन वर्ल्डमध्ये वावरल्यानंतर ही जोडी आता मराठी चित्रपटसृष्टीत दाखल झाली आहे. आगामी पिंडदान या चित्रपटाद्वारे ते मराठी चित्रपटात पदार्पण करीत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रशांत पाटील यांनी केलं असून, बंटी देशपांडे यांनी छायाचित्रण केलं आहे.उदय पिक्चर्स, अश्तिका इरा एलएलपी यांची निर्मिती असलेला पिंडदान सारथी एंटरटेन्मेंटच्या पूनम शेंडे प्रस्तुत करीत आहेत. बंटी प्रशांत यांच्या फॅशन स्टुडिओतून अनेक मॉडेल घडल्या. त्यातील काहींनी अभिनयक्षेत्रातही नाव कमावलं. अभिनेत्री प्राची देसाई, तेजस्विनी पंडित, अभिनेता भूषण प्रधान ही त्यांपैकीच काही नावं. अनेक वर्षं फॅशन इंडस्ट्रीत वावरल्यानंतर या दोघांनी ‘पिंडदान’ हा चित्रपट केला आहे. त्यांच्या जाहिरात आणि फॅशन क्षेत्रातील अनुभवातून साकारलेल्या 'पिंडदान'मध्ये उत्तम कथानक आणि उत्तम कलाकार दिसणार आहेत. बंटी देशपांडे हे १९९१पासून फॅशन फोटोग्राफी आणि छायाचित्रण करतात. आतापर्यंत त्यांनी अनेक शॉर्ट फिल्म, जाहिराती चित्रित केल्या आहेत. प्रख्यात छायालेखक महेश अणे आणि बॉबी सिंग यांच्याकडे सहायक म्हणूनही काम केलं आहे. प्रशांत पाटील यांनी अनेक जाहिराती, व्हिडिओ अल्बम दिग्दर्शित केले आहेत. गेल्या २० वर्षांहून अधिक ते मॉडेल आणि अभिनय प्रशिक्षण देतात. नागपूरमध्ये असताना त्यांनी आताचे आघाडीचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासह मराठी आणि हिंदी नाटकांतून काम केलं होतं. जयदेव हट्टंगडी यांची नाट्य कार्यशाळाही केली होती.
अनोखी प्रेमकथा 'पिंडदान' लवकरच
By admin | Published: April 08, 2016 1:51 AM