मुंबई - मराठीत आजपर्यंत अनेक रोमँटीक, काही कादंबरींवर आधारित तर नुकतेच सामाजिक विषयांच्या खोलात जाणारे सिनेमे आले. तर, सत्य घटनांवर आधारितही चित्रपट मराठी सिनेसृष्टीनं हाताळले आहेत. मात्र, मूळशी पॅटर्न हा वेगळ्याच धाटणीचा वास्तववादी सिनेमा येत्या शुक्रवारी 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनापूर्वीच वादात सापडलेल्या या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. वाढत्या शहरीकरणासाठी बळकावल्या जाणाऱ्या जमिनीच्या वादावर हा चित्रपट भाष्य करतो. नुकताच युट्यूबवर याचा ट्रेलर लाँच झाला असून त्यास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
प्रविण विठ्ठल तरडे दिग्दर्शित आणि अभिजीत भोसले ज्येन्युईन प्रोडक्शन निर्मित 'मुळशी पॅटर्न' चित्रपटावर प्रदर्शनापूर्वीच टीका झाली होती. चित्रपटातील एका गाण्यात रिअल लाईफमधील कुख्यात गुंडाना स्थान देण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील मूळशी तालुक्यात जमिनींची मोठ्या प्रमाणात विक्री करुन शहरांची हद्दवाढ करण्यात आली. त्या वाढत्या शहरीकरणातील जमिनीच्या वादावर हा चित्रपट भाष्य करतो. ही केवळ 'एका तालुक्याची नाही, अख्ख्या देशाची गोष्ट'... असल्याचं दिग्दर्शकानं म्हटलंय. हद्दवाढीच्या व्यवहारात गरिब शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावात विकत घेऊन तेथे आयटी पार्क, बिझनेस मॉल आणि उत्तुंग इमारती बनविण्यात येतात. शेतकऱ्यांच्या जमिनी विकून किंवा त्यांचा व्यवहार जुळवून अनेकजण कोट्यधीश होतात. मात्र, जमिन विकणारा शेतकरी भिकेला लागतो. तर, या व्यवहारांतूनच अनेक गुंठामंत्र्यांचा जन्म होतो. त्यातूनच गुंडगिरी, टोळीयुद्ध आणि गुन्हेगारी वाढीस लागते. हेच गुंठामंत्री भविष्यात राजकारणाची वाट धरतात. राजकारण आणि पोलिस प्रशासनाला हाताशी धरून आणखी जमिनी बळकावण्याचा डाव साधण्यात येतो. या सर्व बाबींवर हा चित्रपट प्रकाश टाकतो, शेती आणि मातीशी प्रत्येक माणूस जोडलाय. त्यामुळेच वेगळ्या धाटणीचा विषय घेऊन येणाऱ्या या चित्रपटाची उत्सुकता महाराष्ट्रातील प्रेक्षकास लागली आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमधील अॅक्शनपट दृश्ये, जमिन विकायची नसते, राखायची असते, यांसारखे दमदार संवाद आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी व महेश मांजरेकर यांची हटके भूमिका पाहण्यासाठी 'मुळशी पॅटर्न'ला प्रेक्षक गर्दी करतील, असंच या ट्रेलरवरुन दिसतय. येत्या शुक्रवारी 23 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. दरम्यान, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीही यापूर्वी लालबाग परळ या चित्रपटातून मुंबईतील गिरणीकामगारांच्या जमिनी बळकावणाऱ्या उद्योजक लॉबीवर आणि गिरणी कामगारांवर प्रकाश टाकला होता.