Join us

जया प्रदा यांच्या विरोधात अटक वॉरंट, उत्तर प्रदेश पोलिस अभिनेत्रीच्या शोधात; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 10:39 AM

१० जानेवारीपर्यंत जया प्रदा यांना अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश आहेत. 

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा (Jaya Prada) यांचा उत्तर प्रदेशचे पोलिस शोध घेत आहेत. तसंच पोलिसांकडे अजामीनपात्र अटक वॉरंट आहे. नुकतंच जया प्रदा यांच्या अटकेसाठी पोलिसांचं पथक शहजादनगर येथील नीलावेनी कृष्णा विद्यालय ऑफ नर्सिंगमध्ये पोहोचलं. मात्र त्या तिथे नव्हत्या. आता पोलिस दिल्ली आणि मुंबईमध्ये त्यांचा शोध घेत आहेत. १० जानेवारीपर्यंत जया प्रदा यांना अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश आहेत. 

जया प्रदा यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी दोन केसेस दाखल आहेत. हे दोन्ही प्रकरणं 2019 च्या लोकसभा निवडणूकची आहेत. तेव्हा जया प्रदा रामपूरमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढल्या होत्या. एक केस स्वार पोलिस ठाण्यात दाखल आहे. आचारसंहिता लागू असतानाही १९ एप्रिल रोजी नूरपूर गावातील रस्ता उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तर दुसरी केस केमरी पोलिस ठाण्यातील आहे. पिपलिया मिश्र गावात आयोजित जनसभेत आपत्तीजनक टिप्पणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 

दोन्ही केसमध्ये पोलिसांनी तपास करुन आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. या प्रकरणाची सुनावणी एमपी-एमएलए विशेष न्यायालयात सुरु आहे. त्या मागील अनेक तारखांपासून कोर्टात हजर झालेल्या नाहीत. याविरोधात त्यांच्यावर चार वेळा अजामीनपात्र वॉरंट जारी झाला आहे. 

न्यायालयाने जया प्रदा यांच्या अटकेसाठी पोलिस अधिक्षकांना विशेष टीम गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. केमरी केसमध्ये अधिक्षकांनी चार दिवसांपूर्वीच टीम गठीत केली होती जी दिल्ली आणि मुंबईमध्ये अभिनेत्रीचा शोध घेत आहे. तर आता अधिक्षकांनी न्यायालयाच्या आदेशानुसार स्वार पोलिसांची टीमही गठीत केली आहे.

एसपी राजेश द्विवेदी यांनी सांगितले की,'न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत अभिनेत्रीला हजर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या अटकेचा प्रयत्न सुरु आहे. त्यांच्या नर्सिंग कॉलेजवर शोध घेतला गेला होता. आता दोन्ही टीमकडून अजूनही तपास सुरु आहे. 

टॅग्स :जया प्रदाअटकउत्तर प्रदेशलोकसभा निवडणूक २०१९