श्वास रोखून धरायला लावणारं रहस्य...उत्कंठेचं टोक गाठायला लावणारा वेगवान घटनाक्रम...बुध्दिमत्ता, कूटनीती आणि धाडस यांच्या जोरावर बहात्तर तास चाललेला हा रोमांचक अद्भुत थरार... मुरलीधर खैरनार लिखित 'शोध' या विलक्षण लोकप्रिय ठरलेल्या कादंबरीतून आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते उपेंद्र लिमये आणि अभिनेत्री केतकी थत्ते यांच्या जबरदस्त दमदार आवाजात स्टोरीटेल मराठी खास इतिहास-साहित्यप्रेमींसाठी घेऊन येत आहे.
१६७० साली शिवाजीराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली, पण सुरतेहून स्वराज्यात परत येताना या लुटीतला प्रचंड ऐवज हरपला! कुठे गडप झाला हा खजिना? काय रहस्य दडलं होतं त्या खजिन्यात? ही एक घटना आणि तो परत मिळविण्यासाठी वर्तमान काळातील दोन प्रकृतींमधला संघर्ष शोध कादंबरीत अत्यंत उत्कंठावर्धक आणि रहस्यमयरित्या दिवंगत लेखक मुरलीधर खैरनार यांनी ‘शोध’ या कादंबरीत रंगविला आहे.
अभिनेता उपेंद्र लिमये या कादंबरी विषयी बोलताना म्हणाले, "किशोर कदम, सचिन खेडेकर, हे माझे समविचारी मित्र जेव्हा एखादं नवं काही ऐकतात, वाचतात तेव्हा लगेच एकमेकांना सुचवतो. त्यांच्या संदर्भानुसार मुरलीधर खैरनारांची अफलातून ‘शोध’ कादंबरी वाचली. तिने मला झपाटून टाकले. माझी उडवून मला अखंड गुंतवून ठेवण्यात ‘शोध’ यशस्वी झाली. सकस कथाबीज आणि सुबक मांडणीमुळे स्टोरीटेलवर ऑडिओ रूपात ती ऐकताना रसिकही गुंतून जाणार हे नक्की". तर अभिनेत्री केतकी थत्ते म्हणाल्या "मीही ही कादंबरी अहोरात्र सलग तीन दिवसात वाचून काढली. एकदा हातात धरली की संपल्याशिवाय चैन पडत नाही. आपण तहान भूक सगळं हरपून कादंबरीत गुंतून जातो. लेखक मुरलीधर खैरनार यांच्या लेखणीची ही किमया आहे. स्टोरीटेलची ही निवड युनिव्हर्सल असून, सर्वांनी एकदा ऐकालाच हवी, अशी अप्रतिम कलाकृती"खजिन्याचा ‘शोध’ घेणारी थरारक कथा मुरलीधर खैरनारांनी रंगवताना शिवकालीन अस्सल नोंदी, दस्तावेज याचा पुरेपूर उपयोग, भौगोलिक भान ठेवून केला आहे..