कंगना राणौतचा कुठलाही चित्रपट येवो, वाद हा ठरलेलाच. नव्या चित्रपटासोबतच्या प्रदर्शनासोबत जुने वाद आएि बॉलिवूडवर आगपाखड करण्याची एकही संधी कंगना सोडत नाही. लवकरच कंगनाचा ‘जजमेंटल है क्या’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि कंगना यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी तिने काय केले तर एका पत्रकारासोबत ‘पंगा’ घेतला. भर पत्रकार परिषदेत एका पत्रकारासोबत ती जोरदार भांडली.पीटीआय वृत्तसंस्थेचे पत्रकार जस्टीन राव यांनीपत्रकार परिषदेत कंगनाला प्रश्न विचारला. प्रश्न विचारण्याआधी त्यांनी आपले नाव सांगितले. त्यांचे नाव ऐकून कंगनाला तिच्याबद्दल लिहिलेली एक बातमी आठवली. ‘मणिकर्णिका’च्या प्रदर्शनावेळी तिच्याबद्दल ही बातमी लिहिण्यात आली होती. मग काय, क्षणात कंगनाचा पारा चढला आणि तिने पत्रकारावर हल्लाबोल केला.
‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या वेळी माझ्याबद्दल जाणीपूर्वक खोट्या बातम्या लिहिल्या गेल्यात. माझ्याविरोधात खोट्या गोष्टी ट्वीट केल्या गेल्यात, असा आरोप तिने केला. एवढेच नाही तर जस्टीन राव यांच्यावरही तिने आगपाखड केली. ‘मणिकर्णिका’च्या रिलीजवेळी जस्टिन राव माझी मुलाखत घ्यायला आले होते. ते तीन तास माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये होते. त्यांनी माझ्यासोबत जेवणही केले. पण तरीही माझ्या आणि माझ्या चित्रपटाबद्दल वाईट गोष्टी लिहिल्या. त्यांनी नंतर मला मॅसेजही केला होता, असे कंगना म्हणाली.