सध्या बॉक्सऑफिसवर शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'पठाण'ने धुमाकूळ घातला आहे. आता एखादा हिंदी सिनेमा तेही शाहरुख खानचा चालतोय म्हणल्यावर बॉलिवुडची क्वीन कंगना रणौतने (Kangana Ranaut) प्रतिक्रिया दिली नाही असे कसे होईल. कंगनाने नुकतीच पठाणची जाहीर स्तुती केली आहे. पठाण सिनेमा चांगला चालत आहे असे चित्रपट चालले पाहिजे असे विधान तिने केले होते. मात्र यानंतर केलेल्या ट्वीटमधून तिने पुन्हा वाद सुरु करणारं विधान केलंच. आणि तिच्या आ ट्वीटवर चक्क उर्फी जावेदने (Urfi Javed) प्रतिक्रिया दिली आहे. म्हणजे नेहमी वादात असणाऱ्या दोन अभिनेत्रींनी आता एकमेकींशीच पंगा घेतला आहे.
कंगनाने काय ट्वीट केलं ?
कंगनाने तिच्या ट्वीटमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात एका थिएटरमध्ये लोक पठाण चित्रपट एंजॉय करताना दिसत आहेत. प्रिया गुप्ता यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे आणि त्यावर कॅप्शन दिले की, पठाणच्या यशाबद्दल शाहरुख आणि दीपिकाचे अभिनंदन.याचाच अर्थ हिंदू असो किंवा मुस्लीम शाहरुखचे सगळेच चाहते आहेत, बॉयकॉटचा सिनेमावर उलट चांगला परिणाम झालाय, चांगले संगीत आहे, भारत सुपर सेक्युलर आहे.
कंगनाने हे ट्वीट रिट्वीट केले आणि ती म्हणाली, 'खूपच चांगलं परीक्षण आहे. या देशाने सर्वच खान नावाच्या कलाकारांना प्रेम दिलंय, प्रसंगी केवळ खान यांनाच प्रेम दिलंय. मुस्लिम अभिनेत्रींवर तर विशेष प्रेम आहे. त्यामुळे देशावर द्वेष आणि फॅसिजमचा आरोप करणं कितपत योग्य आहे. जगात भारतासारखा कोणातही देश नाही.'
कंगनाच्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. पण एका प्रतिक्रियेने सर्वच नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ते म्हणजे सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदचे ट्वीट. उर्फीने कंगनाच्या ट्वीट ला रिप्लाय देत तिलाच अक्कल शिकवली आहे. उर्फी म्हणते, 'ओह माय गॉश! ही काय विभागणी आहे, मुस्लिम कलाकार, हिंदू कलाकार. कला ही काय धर्मानुसार विभागली जात नाही. कलाकार केवळ कलाकार असतात. '
तर यावर कंगनाने उर्फीला उत्तर देत ट्वीट केलं, 'माझी प्रिय उर्फी, तू म्हणतेस ते आदर्श जग आहे. जोपर्यंत समान नागरी कायदा लागू होत नाही तोवर हा देश असाच विभागला जाणार आहे आणि हे संविधानात लिहिलेलं आहे. चला आपण सर्वच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे समान नागरी कायदा लागू करा अशी मागणी करुया.'
नेहमी आपल्या वागण्याने आणि बोलण्याने इतरांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या दोन अभिनेत्रीच आता एकमेकींना ट्विटरवर भिडल्या आहेत. उर्फीने थेट बॉलिवुडच्या क्वीनशी पंगा घेतल्याने आता हा ट्विटरवरील वाद आणखी वाढतो का हे बघणे महत्वाचे आहे.