Join us  

कुठून आला ‘उरी’चा लोकप्रिय डायलॉग ‘हाऊ इज द जोश’?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 10:38 AM

अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या सुपरडुपर हिट चित्रपटातील ‘हाऊ इज द जोश’ हा डायलॉग प्रचंड गाजला. या संवादाची कल्पना अखेर कुठून आली? कशी आली? यामागेही एक मजेशीर किस्सा आहे.

 अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या सुपरडुपर हिट चित्रपटातील ‘हाऊ इज द जोश’ हा डायलॉग प्रचंड गाजला. सोशल मीडियापासून गल्लीबोळापर्यंत पोहोचला. अगदी राजकारण्यांमध्येही ‘उरी’चा हा संवाद लोकप्रिय झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून तर त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या भाषणातही या संवादाने स्थान मिळवले. संसदेतही हा संवाद गुंजला.

या संवादाची कल्पना अखेर कुठून आली? कशी आली? यामागेही एक मजेशीर किस्सा आहे. होय, चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनी हा किस्सा सांगितलाय. आदित्यने सांगितले की, माझे काही मित्र होते. ते डिफेन्स बॅकग्राऊंडचे होते. त्यांच्यासोबत मी अनेकदा आर्मी क्लबमध्ये जायचो. दिल्लीत एक असे ठिकाण होते, तिथे आम्ही नाताळ व नवे वर्ष साजरे करायचो. याठिकाणी एक माजी ब्रिगेडियर यायचे. ते आम्हाला पाहून हा डायलॉग म्हणायचे आणि त्यांच्या हातात चॉकलेट असायचे. ‘हाऊ इज द जोश?’ असे ते विचारायचे. यावर आम्ही ‘हाई सर’, असे उत्तर द्यायचो. आमच्यापैकी ज्याचा आवाज सगळ्यात तगडा असायला, त्याला ते चॉकलेट मिळायचे. मी खाण्याचा शौकीन होतो. त्यामुळे मी अगदी छाती फाडून त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचो आणि दरवेळी चॉकलेट मलाच मिळायचे. ‘उरी’त मी हाच डायलॉग वावरला. हा डायलॉग इतका गाजेल, इतका लोकप्रीय होईल, याची मलाही कल्पना नव्हती. सैन्यात फार कमी लोक या लाईनचा वापर करतात. मी या लाईनचा योग्य वापर केला आणि ही लाईन एका वेगळ्या उंचीवर पोहोचली.

‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ची स्क्रिप्ट लिहिणे सुरु केले, तेव्हाच हा डायलॉग वापरायचा हे मी ठरवून टाकले होते. या डायलॉगमध्ये माझ्या आठवणी आहेत, असेही आदित्यने सांगितले. 

 जम्मू-काश्मीरच्या ‘उरी’ येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात 19 भारतीय जवानांना वीरमरण आले होते. भारताने सर्जिकल स्ट्राइकने या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ हा सिनेमा याच सर्जिकल स्ट्राइकवर आधारित आहे. चित्रपटाची कथा विहान शेरगिल या भारतीय जवानाभोवती फिरते. ही भूमिका विकी कौशलने साकारली आहे.

टॅग्स :उरीविकी कौशल