टीव्ही जगतात ‘कोमोलिका’ या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिची जुळी मुले क्षितीज व सागर हे दोघेही आईच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहेत. वासू भगनानीच्या ‘हमशक्ल’ या चित्रपटात क्षितीज व सागर झळकले होते. सैफ अली खान व रितेश देशमुख हे या चित्रपटात लीड रोलमध्ये होते. आता त्यांना साथ मिळाली आहे ती, एकता कपूरची. होय, एकता कपूरच्याच ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेनेचं क्षितीज व सागरची मॉम उर्वशीला नवी ओळख दिली होती. या मालिकेत निगेटीव्ह कॅरेक्टर साकारूनही कोमोलिका उर्फ उर्वशी ढोलकिया प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली होती. आता उर्वशीच्या मुलांनाही एकता कपूरच्या कंपूत एन्ट्री मिळाली आहे.
एकता कपूरच्या बॅनरखाली बनलेल्या एका चित्रपटात क्षितीज व सागरला संधी मिळाली आहे. अर्थात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून. होय, एकता कपूरच्या आगामी ‘ड्रिम गर्ल’ या चित्रपटात क्षितीज व सागर असिस्टंट डायरेक्टर म्हणून जबाबदारी पार पाडतील. निश्चितपणे दोघांसाठीही ही मोठी संधी आहे.