आयुष्मान खुराणाचा शुभ मंगल ज्यादा सावधान हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून हा चित्रपट कधी प्रदर्शित होतील याची प्रेक्षक वाट पाहात होते. गेल्या काही महिन्यात आयुष्मानने सतत हिट चित्रपट दिले असल्याने त्याच्याकडून सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबतच जितेंद्र कुमार, गजराज राव, नीना गुप्ता, मनु ऋषि चड्ढा, सुनीता, मानवी यांच्या मुख्य भूमिका आहेत. समलैंगिकता या कॉन्सेप्टवर हा चित्रपट आधारित असून एक वेगळा मुद्दा या चित्रपटाद्वारे मांडण्याचा दिग्दर्शकाने प्रयत्न केला आहे. या चित्रपटाची दखल थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली आहे.
मानवी अधिकारासाठी लढणारे कार्यकर्ते आणि एलजीबीटीक्यू अॅक्टिव्हिस्ट पीटर टॅचेल्स यांनी शुभ मंगल ज्यादा सावधान या चित्रपटाच्या संदर्भात एक ट्वीट केले आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, भारतात गे रोमान्सवर आधारित शुभ मंगल ज्यादा सावधान हा चित्रपट प्रदर्शित झाला असून हा चित्रपट सगळ्यांचे मन जिंकेल अशी आशा आहे. समलैंगिकतेविषयी लोकांच्या मनात असलेली अढी दूर होईल अशी अपेक्षा करूया... या त्यांच्या ट्वीटला रिट्वीट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रेट असे लिहिले आहे. या ट्वीटचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
शुभ मंगल ज्यादा सावधान या चित्रपटाचे बजेट 50 कोटी असून हा चित्रपट भारतात 2500 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 9.25 ते 9.50 कोटी इतके कलेक्शन केले आहे.