Join us

७५ रुपये देऊन जमिनीवर झोपायचो: मिथुन चक्रवर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2024 11:53 AM

या प्रसंगातून मी खूप मोठा धडा घेतला.  

(संकलन : महेश घोराळे)

असे समजा की, मी फुटपाथवरून येथपर्यंत पोहोचलो. काेलकात्याहून मुंबईत आल्यानंतर प्रारंभीचा काळ प्रचंड संघर्षाचा होता. ना राहायला छत होते, ना जेवणाचा  ठाव ठिकाणा. बरेच दिवस बगीच्यात झोपावे लागले. कधी कुणाच्या वस्तीगृहाच्या बाहेर झोपलो. ही अवस्था पाहून एका मित्राने मला माटुंगा जिमखान्यात मेंबरशिप मिळवून दिली. जेणेकरून मला सकाळी किमान तेथील बाथरूम वापरता येईल, पण आजचे जेवण कुठे अन् रात्री झोपणार कुठे, याचा काही पत्ता नव्हता. कधीतरी असेही  वाटायचे की, कदाचित मला आत्महत्या करावी लागेल. पण, एक सांगतो की याचा चुकूनही मनात विचार करू नका, कारण कोणत्याही संघर्षाशिवाय आपल्याला आपले जीवन संपविण्याचा अधिकार नाही. 

दोन जमेच्या बाजू 

पुढे मी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये गेलो. चांगला शिकलो. उत्कृष्ट रिझल्टही लागला. तेथून आल्यावर मुंबईत पुन्हा संघर्ष सुरू झाला.  

सुरुवातीला मला माझ्या वर्णाबाबत चिंता वाटायची. कदाचित माझा चेहरा आणि दिसण्यामुळे मला डावलले जात असावे, असे वाटायचे. 

पण मी उत्कृष्ट डान्स करू शकत होतो, चांगली फायटिंग आणि मार्शल आर्टही करू शकत होतो. त्यामुळे या जमेच्या बाजूंवर मी पुढे गेलो. 

मी ठरवले असे काही करायचे की, माझ्या वर्णाकडे लोकांचे दुर्लक्ष होईल. मी हे करत गेलो आणि हळूहळू वेळेसोबत सगळे काही बदलत गेले.

एके रात्री झोपेत मला उंदीर चावला अन्... 

कोळीवाड्यात मी पेइंगगेस्ट राहत होतो. सोबत रुममेट होता. ७५ रुपये देऊन मी जमिनीवर झोपायचो.  तो दीडशे रुपये देऊन खाटेवर झोपायचा. एके रात्री मला उंदीर चावला. रुममेट बाहेर असल्याने मी उठून त्याच्या खाटेवर झोपलो. अचानक तो आला अन् माझ्यावर ओरडला की, मी या खाटेसाठी दीडशे रुपये देतो. या प्रसंगातून मी खूप मोठा धडा घेतला.  

आपल्याला हारणे खूप कमी शिकवले गेले  फुटबॉल, क्रिकेटची मॅच असो किंवा आणखी काहीही आपल्याला हरणे खूप कमी शिकवले गेले. त्यामुळे हरलो की आपण खचून जातो. पण, हरणे स्वीकारले पाहिजे. हरलो तर हरलो. पुन्हा प्रयत्न करा. हा दिवस विसरणार नाही . 

११ सप्टेंबर १९६९ हा दिवस मी विसरू शकणार नाही. या दिवशी दादर स्थानकावर उरतलो. पुढे जातो, तर एका कुलीने आवाज दिला. ‘ए हिरो कहा जाना हैं’. तो सर्वांना तसेच म्हणत होता, पण क्षणभर मला वाटले की, मी हिरोसारखा दिसतो. त्या गरिबाचा आशीर्वाद मला मिळाला असेल.

टॅग्स :मिथुन चक्रवर्तीबॉलिवूड