आपल्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री उषा जाधवला तिच्या 'माई घाट - क्राइम नंबर 103/2005' सिनेमासाठी मानाच्या इंडो जर्मन फिल्म वीकमध्ये सर्वोतकृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याची माहिती स्वत: उषा जाधवने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली. हा पुरस्कार मिळाल्यावर उषाने सिनेमाचे दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन, निर्मात्या मोहिनी गुप्ता आणि सिनेमाच्या संपूर्ण टीमला धन्यवाद दिले आहेत.
उषाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले की, 'इंडो जर्मन फिल्म फेस्टिव्हल, बर्लिनमध्ये काल रात्री माझा सिनेमा 'माई घाट- क्राइम नंबर 103/2005' साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्याने मी फार आनंदी आहे. यासाठी मी मोहिनी गुप्ता, अनंत महादेवन आणि संपूर्ण टीमला धन्यवाद देते. तसेच सर्वांचे अभिनंदन'.
तसा या सिनेमासाठी उषा जाधवला मिळालेला हा पहिला पुरस्कार नाही. याआधीही साऊथ एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि गेल्यावर्षी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्येही उषाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
या सिनेमाची कथा एका आईची आहे जिच्या मुलाला दोन पोलीसानी खोट्या आरोपाखाली तुरूंगात डांबलं गेलं होतं. त्यांच्या मुलाचं नाव उदय कुमार होतं. प्रभावती लोकांच्या घरी धुणी-भांडी करायची आणि त्यांचा मुलगा कचरा उचलत होता. ओणमचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रभावती यांनी मुलाला काही पैसे दिले होते. पोलिसांना त्याच्याकडील पैसे पाहून शंका आली आणि चोर समजून उदयला अटक केली. तुरूंगात उदयला खूप मारण्यात आलं आणि नंतर जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याचा मृतदेह रस्त्यावर बेवारसपणे फेकण्यात आला. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या कथेवर आधारित सिनेमात प्रभावतीची भूमिका उषा जाधवने साकारली आहे.
काही दिवसांपूर्वीच उषाने एका स्पॅनिश सिनेमाचं शूटींग सुरू केलंय. जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच उषा स्पेनमध्ये गेली होती आणि तिथे तिने तिच्या पुढील 'ला नुएवा नॉर्मलिदाद (La Nueva Normalidad)' चं शूटींग सुरू केलं. हा सिनेमा कोरोना व्हायरसच्या नंतरच्या अवस्थेसंबंधी असू शकतो. स्पॅनिश सिनेमांचे प्रसिद्ध दिग्दर्शक एलेजांद्रो कोर्तेस यांचा हा सिनेमा आहे.