प्रख्यात तबलावादक, संगीतकार आणि तालतज्ज्ञ, जागतिक पातळीवरचे ख्यातकीर्त, पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याच्यावर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये हृदयविकारावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. तबल्यावर त्यांच्या बोटांतून निघणारे जादूई सूर आता पोरके झालेत. पहिल्या आंतरराष्ट्रीय मैफिलीत केवळ 5 रुपये कमावणाऱ्या तबल्याच्या जादूगारनं आपल्या मागे किती संपत्ती सोडली आहे, हे जाणून घेऊया.
झाकीर हुसेन यांनी आपल्या कर्तृत्वानं भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात वेगळी ओळख मिळवली. प्रसिद्धी, चाहत्यांचं प्रेम यासोबतच महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या झाकीन हुसेन यांनी भरपूर संपत्तीही कमावलीय. झाकीर हुसेन यांची पहिली कमाई 5 रुपये होती. ही कमाई त्यांना स्टेजवर तबला वादनासाठी मिळाली होती. जगप्रसिद्ध तबला उस्तादाने आपल्या कारकिर्दीतील प्रारंभीच्या काळात त्यांनी खूप मेहनत घेतली. भारतीय शास्त्रीय संगीताला जागतिक स्तरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तबल्याला जागतिक मान्यता तर दिलीच, शिवाय नव्या पिढीच्या संगीतकारांसमोर एक आदर्श निर्माण केला
deccanherald च्या अहवालानुसार, झाकीर हुसेन यांची एकूण संपत्ती सुमारे 8 कोटी होती. एका कॉन्सर्टसाठी हुसेन हे तब्बल 5 ते 10 लाख रुपये घेत असत. त्यांच्या पश्चात पत्नी कथ्थक नृत्यांगना अँटोनिया मिनेकोला, मुली अनीसा कुरेशी आणि इसाबेला कुरेशी, भाऊ तौफिक कुरेशी, फजल कुरेशी आणि जगभरात विखुरलेला शिष्य परिवार आहे. पहिल्या मैफिलीत केवळ 5 रुपये कमावण्यापासून ते पाच ग्रॅमी आणि तिन पद्म पुरस्कार जिंकून प्रसिद्ध उस्ताद बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास डोळे दिपावणारा आहे. भारतीय संगीताला जागतिक व्यासपीठावर नेणाऱ्या या महान कलाकाराला संपूर्ण जग सलाम करत आहे.