बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा (Jaya Prada) गेल्या अनेक दिवसांपासून वाँटेड आहेत. आचार संहिता उल्लंघन प्रकरणी त्यांच्यावर उत्तर प्रदेश न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दरम्यान त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंटही जारी करण्यात आलं आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी पोलिसांची पथकं त्यांचा शोध घेत आहेत. न्यायालयाने जयाप्रदा यांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. वेळेची मुदत मिळावी यासाठी त्यांनी केलेला अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. तसंच रोखही जप्त केली आहे. एसपीला पुन्हा एकदा जयाप्रदा यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहेत.
जयाप्रदा यांच्या या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 जानेवारी रोजी होणार आहे. माजी खासदार जयाप्रदा यांच्याविरोधात 2019 साली लोकसभा निवडणूकीवेळी आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी दोन पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. हे प्रकरण कोर्टाच्या विचाराधीन होते. मात्र जयाप्रदा आजपर्यंत एकदाही न्यायालयात हजर झाल्या नाहीत. कोर्टाने अनेकदा त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. पोलिसांना अटकेचे आदेशही दिले. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता त्या अनेक महिन्यांपासून गायब आहेत. तसंच न्यायालयातही हजर होत नाहीत. नुकतंच जयाप्रदा यांच्या विरोधात सातवे अटक वॉरंट जारी झाले आहे.
न्यायालयाने जया प्रदा यांच्या अटकेसाठी पोलिस अधिक्षकांना विशेष टीम गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. केमरी केसमध्ये अधिक्षकांनी चार दिवसांपूर्वीच टीम गठीत केली होती जी दिल्ली आणि मुंबईमध्ये अभिनेत्रीचा शोध घेत आहे. तर आता अधिक्षकांनी न्यायालयाच्या आदेशानुसार स्वार पोलिसांची टीमही गठीत केली आहे.