'युवा सिंगर एक नंबर' हा नवाकोरा आणि थोडा निराळा कार्यक्रम नुकताच सुरु झाला आहे. वैभव मांगले आणि सावनी शेंडे या कार्यक्रमात परीक्षकांच्या भूमिकेत आहेत. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत असून स्पर्धकांसाठी वयाचे कुठलेही बंधन नसलेल्या या स्पर्धेत १६ गायक पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून विविध वयोगटातील स्पर्धक यात सहभागी झाले आहेत. परीक्षण करतांना दोन्ही परीक्षकांचा नक्कीच कस लागणार आहे. एक वेगळी संकल्पना घेऊन आलेला हा कार्यक्रम, संगीत क्षेत्रातील स्पर्धांना मिळालेल्या एका कलाटणीची नांदी ठरू शकतो.
पहिलाच भाग अगदी दणक्यात पार पडला. स्पर्धकांनी सादर केलेल्या गाण्यांवर वैभव मांगले आणि मृण्मयी देशपांडे हे देखील थिरकतांना पाहायला मिळाले. सर्वच स्पर्धकांचे उत्तम सादरीकरण पहिल्या भागात पाहायला मिळाले. या कार्यक्रमाची संकल्पना, संगीतातील उत्तम प्रतिभा आणि आर्थिक परिस्थिती यांची सांगड घालणारी असणार आहे. प्रतिभावान परंतु गरजू असणाऱ्या व्यक्तींना एक लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ केली जाणार आहे. स्पर्धेचा भाग होऊन, आपली प्रतिभा सादर करत राहणे किंवा ती आर्थिक मदत स्वीकारणे, असे दोन पर्याय या गायकापुढे असतील.
आर्थिक मदत स्वीकारणाऱ्या कलाकाराला, पुढील स्पर्धेचा भाग होता येणार नाही. ही आर्थिक मदत स्वीकारणारा एक स्पर्धक सुद्धा पहिल्या भागात पाहायला मिळाला. याशिवाय प्रत्येक स्पर्धकाला एक विशिष्ट रक्कम देण्यात येईल. ही रक्कम जतन करण्याचे काम सुद्धा स्पर्धकांना आपल्या प्रतिभेच्या माध्यमातून करायचे आहे. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी सर्वोत्तम स्पर्धकासह, सर्वांत कमी ठरलेल्या स्पर्धकाचे नावही जाहीर करण्यात येईल.
आठवड्यातील सर्वांत कमी दर्जाचे सादरीकरण करणाऱ्या स्पर्धकाच्या खात्यातील पैसे सर्वोत्तम स्पर्धकाला मिळतील. त्यामुळेच आपल्याला मिळालेली रक्कम टिकवून ठेवणे सुद्धा स्पर्धकांच्या हातात असेल. उत्तम सादरीकरण करणाऱ्या स्पर्धकाला त्याचा फायदा निश्चितपणे मिळेल. पूर्णपणे नव्या संकल्पनेसह सुरु झालेला या कार्यक्रम संगीत क्षेत्रातील स्पर्धांचा चेहरामोहरा बदलणारा ठरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.