'झी युवा' वाहिनी प्रेक्षकांसाठी नेहमीच नव्या आणि खास गोष्टींचा खजिना घेऊन येते. अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय झालेला 'युवा सिंगर एक नंबर' हा कार्यक्रम याच दर्जेदार मेजवानीचा एक भाग आहे. स्पर्धेतील चुरस अधिक वाढलेली असल्याने प्रत्येक स्पर्धकाकडून उत्तमोत्तम सादरीकरण पाहायला मिळत आहे. आपली सर्वोत्तम कला सादर करण्याचा प्रयत्न प्रत्येकच स्पर्धक करत आहे. एम. एच. फोक हा गट सुरुवातीपासूनच यात आघाडीवर आहे. दर्जेदार कला सादर करून अनेकदा त्यांनी सर्वांची मने जिंकली आहेत. हा आठवडा सुद्धा त्याला अपवाद ठरला नाही.
'चांगभलं रं' हे गाणं 'एम एच फोक'ने सादर केलं. मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मंडळींना एका सुंदर गाण्याची अनुभूती या गाण्यामुळे मिळाली. गाणं ऐकत असताना परीक्षक व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. हा या आठवड्यातील सर्वोत्तम परफॉर्मन्स ठरला आहे. त्यांचं गाणं ऐकताना वैभव मांगले फारच भावुक झाला. त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत. सावनी शेंडे हिने सुद्धा 'आमचे डोळे सर्व काही बोलून गेले आहेत; वेगळं काही बोलण्याची गरज नाही' असं म्हणत स्पर्धकांचे कौतुक केले. देवाला साद घालत असतानाची त्यांची तळमळ सादरीकरणाच्या वेळी दिसत होती.
'एम एच फोक'चे परीक्षकांनी भरभरून कौतुक केले. या कौतुकाचा स्वीकार त्यांनी केला; पण, हे कौतुक स्वीकारत असताना, 'आम्ही फक्त मनापासून देवाला साद घातली, बाकी सारं आपोआप घडत गेलं' असं म्हणत कृतज्ञता सुद्धा व्यक्त केली. या अप्रतिम सादरीकरणाचे कौतुक करण्यात परीक्षक सुद्धा इतके तल्लीन झाले होते, की सर्वोत्तम गाण्यासाठी द्यायचा असलेला ब्लास्ट द्यायचा राहून गेलाय, हेदेखील काही काळ त्यांच्या ध्यानात आले नाही.