स्पृहा जोशी, अभिनेत्री
प्यारवाली लव्हस्टोरी सर्वांचीच असते. पण, कुणाचं प्रेम हे लग्नाअगोदर सुरू झालेलं असतं. तर कुणाचं प्रेम हे लग्नानंतर सुरू होतं. लग्नाअगोदरच्या प्रेमाला लव्हमॅरेज असं म्हणतात. प्रेमप्रकरणातून न झालेल्या किंवा कुटुंबीयांनी, पै पाहुण्यांच्या मर्जीतून जमवलेल्या लग्नाला अरेंज मॅरेज म्हणतात. मात्र, दोन्ही लग्नामध्ये प्रेम हा धागा कॉमन राहतो. प्रेम हे कलाकारांना होऊ शकतं, राजकारण्यांनाही होऊ शकतं. राजकारण्यांचीही प्यारवाली लव्ह स्टोरी असू शकते. आज तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी हिच्या लग्नाची भन्नाट गोष्ट वाचायला मिळणार आहे. स्पृहानेच सांगितलीय तीची प्यारवाली लव्ह स्टोरी.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना वरद आणि माझी भेट झाली. आम्ही दोघेही कॉलेज रिपोर्टर म्हणून काम करायचो. त्यानंतर, आम्ही चार-पाच वर्षे डेट करत होतो. आमच्या लग्नालाही आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणजे तेरा-चौदा वर्षे एकत्र आहोत. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. जे काही असतं ते थेट बोलतो. मेजर डिसिजन घ्यायचा असतो, तेव्हा एकत्रित विचार करतो. आम्हा दोघांनाही काँटेंट कन्झ्युम करणं खूप आवडतं. पुस्तकं खूप वाचतो. त्याबद्दल एकमेकांना सांगतो. वरदमुळे इंग्रजी पुस्तकं वाचू लागले. तो डिजिटल मार्केटिअर असल्याने ऑनलाइनवर नवीन काय घडतं किंवा काय नवीन ट्रेंड आहे ते सांगतो. मी भावनिक होऊन निर्णय घेते; पण तो खूपच रॅशनल आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांना बॅलन्स करतो. दोघांच्या जमेच्या बाजू जास्त आहेत. सगळ्याच गोष्टी पटत नाहीत, त्यामुळे भांडतोही. त्याने, तसेच आई-बाबांनीही माझ्याकडून गृहिणीसारख्या अपेक्षा केल्या नाहीत. आई-बाबांमुळे माझं बाहेर काम करणं सोपं होतं. प्रत्येक प्रोजेक्टच्या अगोदर किंवा नंतर आम्ही एकमेकांसाठी वेळ काढतो. हाच धागा आम्हाला बांधून ठेवतो.