ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - 7 फेब्रुवारीपासून व्हेलेंटाईन वीक या प्रेमोत्सवाला सुरुवात झाली आहे. प्रेमीयुगुलांसाठी हा संपूर्ण आठवडा फारच महत्त्वपूर्ण आणि नात्यात प्रेमाचे रंग गडद करणारा असतो. या आठवड्यात वेगवेगळ्या पद्धतीने सर्वजण आपले प्रेम, भावना व्यक्त करतात.
रोझ डेच्या दिवशी गुलाबाचे फूल देऊन प्रेमोत्सव व्हेलेंटाईन वीकची सुरूवात झाली आहे. आज व्हेलेंटाइन वीकचा दुसरा दिवस, म्हणजे प्रपोज डे. हा दिवस त्या प्रेमीयुगुलांसाठी आहे, ज्यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे, मात्र नकार मिळेल या भीतीने प्रेमाचे शब्द ओठापर्यंत पोहोचू शकले नाहीत. पूर्ण आठवड्यातील 'प्रपोझ डे'ला जरा विशेष महत्त्व आहे. कारण मन की बात आवडत्या व्यक्तीसमोर ठेवण्यासाठी तरुण-तरुणी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात.
प्रेम करणे सोपे वाटत असेल तरी प्रपोज करणे खूप अवघड काम. प्रपोज करण्यासाठी खूप सराव करुनही प्रत्यक्षात मात्र सारंच बारगळतं. पण डरने का नही...मन की बात सरळ बोलून टाकायची... जास्तीत जास्त काही होईल नकारच मिळेल....पण मन की बात सांगितल्याचे समाधान तरी मिळेल... आणि कुणास ठाऊक तुम्हाला तुमचे प्रेम मिळेलही.
कसे कराल प्रपोज ?
वेळेनुसार प्रपोज करण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. पूर्वी लोकं एकमेकांना प्रेमपत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त करायचे. आता फेसबुक, व्हॉट्स अॅपसारख्या सोशल मीडिया तसेच वेगवेगळ्या माध्यमातून 'मन की बात' केली जाते.
लाँग ड्राइव्ह
थंडगार ठिकाणी आपल्या फ्रेंडला लाँग ड्राइव्हवर जा आणि कूल रोमँटिक वातावणात तिचा हात पकडून तिला प्रपोज करा.
चाय पे चर्चा नो खर्चा
तुमचा आणि तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात चहा हा अविभाज्य घटक असेल. तर मस्तपैकी घरातच एकत्र चहा घेण्याचा कार्यक्रम आखा. एकत्र चहा बनवत इधर-उधर की बातोंसहीत दोघांमधील गप्पा शेअर करा. गप्पांच्या ओघात तुमच्या दिल की बात ओठांवर आणून तिला प्रपोझ करा. ही भन्नाट कल्पना तर तुमच्या खिशालाही परवडणारी आहे.
ऑडिओ किंवा व्हिडीयो क्लिप पाठवा
तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी एखादी ऑडिओ किंवा व्हिडीओ क्लिप तयार करा, व्हिडीओमध्ये तुम्ही एकत्र घालवलेल्या क्षणांच्या आठवणी, गंमती त्यांत साठवा, आणि द्या तिला पाठवून. मुलींना हा प्रकार खूपच आवडतो, त्यामुळे ती नक्कीच खूश होईल.
प्रेम पत्र लिहा
'प्रेम पत्र वगैरे लिहिण्याचा जमाना गेला भाई'.... 'कबुतर जा जा जा'चे दिवस गेेले, अशी वाक्य हल्ली कानावर येतच असतात. पण आजही मुलींनी पत्र लिहिलेले आवडते. त्यामुळे प्रपोझ करताना छोटंस का होईना पण पत्र लिहा. त्यात तुमच्या दोघांच्या एखाद्या फोटोचाही समावेश करा. प्रपोझ करण्याची ही पद्धत तिला नक्कीच आवडेल.
समुद्र किनारी गाणं गा
समुद्र किनारी एकत्र फिरायला जा... गप्पा मारा... आणि एखादं प्रेम गीत गाऊन वातावरण रोमँटिक करुन तिच्याजवळ प्रेमाच्या भावना व्यक्त करा. या गुलाबी वातावरणात तुम्हाला तिच्याकडून जादूची झप्पी मिळून होकारही मिळू शकतो.
आवडत्या व्यक्तीला प्रपोझ करण्यासाठी तुम्हाला महागडं आणि मोठं गिफ्टच विकत घ्यायला हवं, असा काही नियम नाही. अशा छोट्या-छोट्या गोष्टींच्या माध्यमातूनही तुम्ही तिच्या किंवा त्याच्यासमोर 'हाल-ए-दिल' बयाँ करू शकता.