अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. नाटक असो किंवा चित्रपट सर्वच क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामगिरीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकताच त्यांना झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं काही सांगत होता. जसे रसिक प्रेक्षक त्यांचे चाहते आहेत तसेच कलाकारही त्यांचे चाहते आहेत. अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) हिने वंदना गुप्तेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
वंदना गुप्ते यांचं गाजलेलं नाटक 'चारचौघी' पुन्हा रंगमंचावर आलंय. यामध्ये त्यांनी साकारलेली भूमिका आता मुक्ता बर्वे साकारत आहे. मुक्ताचाही अभिनय रसिकांना प्रचंड आवडलाय. मुक्ता बर्वे हिने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. ' 'डबलसीट मधे सासू-सून म्हणुन एकत्र होतो, रूद्रम मधे आई- मुलगी म्हणुन आणि आता चारचौघी मधे तर तू साकारलेली विद्या साकारते म्हणुन. निमित्त कोणतंही चालेल एकत्र काम आणि मजा करतच राहू. वंदूताई तुला खूप खूप प्रेम. जशी आहेस तशीच मस्त, बिनधास्त, दिलखुलास रहा. तुझ्या एनर्जीने आम्हाला प्रेरणा देत रहा. झी नाट्य गौरवचे विशेष आभार या दोन ‘विद्या’ एकमेकांना भेटवल्याबद्दल.'
मुक्ताच्या या पोस्टवर वंदना गुप्ते यांनी तिचे आभार मानले आहेत. मुक्ताने 'चारचौघी' या नाटकात 'विद्या' ही भूमिका साकारली आहे. तीच भूमिका वंदना गुप्ते यांनी निभावली होती जी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. आता मुक्ताचंही या नाटकासाठी कौतुक होताना दिसतंय. 'चारचौघी'मध्ये रोहिणी हट्टंगडी, पर्ण पेठे आणि कादंबरी नाईक यांचीही मुख्य भूमिका आहे.