प्रेमाची व्याप्ती केवळ नात्यांपुरती सीमित नसून पाळीव प्राण्यांच्या बाबतीतही तितकीच तीव्र असते. हे दाखवून देणारा ‘अआइई एन्टरटेंन्मेंट’ निर्मित ‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ हा मराठी चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
माथेरानमधल्या ग्रामपंचायतीच्या शाळेत शिकणारी मुलगी तेजू आणि त्याच शाळेच्या आवारात राहणारी ‘व्हॅनिला’, या दोघींच्यांत जिव्हाळ्याचे, मैत्रीचे नाते निर्माण होते. हे नाते उलगडून दाखवताना, तेजूच्या कुटुंबालाही लागलेला ‘व्हॅनिला’चा लळा व त्यांच्यातील प्रेमाची गोष्ट आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
या चित्रपटाची खासियत म्हणजे माथेरानसारख्या नयनरम्य ठिकाणी चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण करणारा ‘व्हॅनिला स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट’ हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक गिरीश विश्वनाथ आणि त्यांची लेक अभिनेत्री जानकी पाठक चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. या सिनेमाची निर्मिती गिरीश विश्वनाथ यांची आहे. कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व दिग्दर्शन अशी सगळी जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. चित्रपटात रवी काळे, राजश्री निकम, राधिका देशपांडे, क्षितीज देशपांडे, विनोद जाधव या कलाकारांच्याही भूमिका आहेत.
या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते डॉ. सुनील निचलानी आहेत. संकलन सागर भाटिया तर छायांकन सचिन खामकर यांचे आहे. संगीत शंतनू नंदन हेर्लेकर यांचे असून जावेद अली, उपग्ना पंड्या, ऋतुजा लाड यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. सहदिग्दर्शन निलेश देशपांडे यांचे आहे. कौटुंबिक मनोरंजन करणारा ‘व्हॅनिला, स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट’ शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.