पणजी : मराठी सिने सृष्टीतील अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे वडिल अच्युत उसगावकर यांचे मंगळवारी गोव्यात निधन झाले. गोव्यात मुक्तीनंतर अधिकारावर आलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मंत्रिमंडळात उसगावकर हे मंत्री होते.
उसगावकर हे मिरामार येथे राहत होते. वृद्धापकाळाने अलिकडे ते आजारी होते. त्यांची प्राणज्योत मालवल्याचे कळताच गोव्यातील विविध समाज घटकांत दु:ख व्यक्त झाले. गोव्याची पोर्तुगीज राजवटीतून 1961 साली मुक्तता झाली व मग महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सत्तेचा काळ सुरू झाला. हा पक्ष 17 वर्षे सत्तेत होता.
उसगावकर हे मगो पक्षाचे नेते होते. आमदार व मंत्री म्हणून 70 च्या दशकात उसगावकर यांनी नाव कमावले. प्रथम भाऊसाहेब बांदोडकर व मग भाऊंची कन्या स्वर्गीय शशिकला काकोडकर यांच्या मंत्रिमंडळात उसगावकर मंत्री होते. प्रतापसिंग राणे, गोपाळराव मयेकर, रमाकांत खलप, स्व जयसिंगराव राणे आदींचे राजकारणातील सहकारी म्हणून उसगावकर यांनी काम केले.
बांबोळीच्या गोमेकाॅ इस्पितळात सकाळी साडे सात वाजता त्यांचे निधन झाले. आज सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार होतील.