शमा भगत
‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘दिलवाले’,‘बदलापूर’,‘अक्टुबर’, ‘जुडवा’ यासारख्या हिंदी चित्रपटात अभिनेता वरूण धवनने कॉमिक तसेच गंभीर भूमिका साकारल्या. स्वत:च्या लूकसोबतच भूमिकेतही नवनवीन प्रयोग करणारा अभिनेता म्हणून आपण वरूणकडे पाहतो. आता हाच डॅशिंग हिरो ‘सुई धागा-मेड इन इंडिया’ या आगामी हिंदी चित्रपटात दिसणार आहे. त्यानिमित्ताने त्याच्याशी मारलेल्या या गप्पा...
* ग्रामीण भागातील युवकाची भूमिका तू प्रथमच साकारत आहेस, काय सांगशील?- मी ज्या युवकाची भूमिका केली आहे त्याचे नाव मौजी आहे. ही व्यक्तीरेखा साकारताना खूप गमतीजमती आणि धम्माल वाटत होते. अनेकदा मला मौजी म्हणून बऱ्याच गोष्टी करण्यापासून थांबवण्यात यायचे. खरंतर मौजीचा प्रवास खूपच संघर्ष आणि आव्हानांनी भरलेला आहे. ममता आणि मौजी हे त्यांच्या आयुष्यातील सुख आणि आनंद कसा मिळवतात, त्यांची स्वप्नं कशी पूर्ण करतात, यावर संपूर्ण चित्रपट अवलंबून आहे.
* एक विवाहित भूमिका तू साकारतो आहेस, काय सांगशील?- बदलापूर मध्येही माझी भूमिका विवाहित व्यक्तीचीच होती. एवढंच की माझी पत्नी चित्रपटाच्या अगोदरच या जगात नव्हती. मी यातही विवाहित व्यक्तीची भूमिका केली आहे. पण, यातही माझ्यात आणि ममतामध्ये माझी अम्मा कायम येत असते. त्यामुळे मी शरतला विचारायचो की, तो विवाहित आहे तर मी काय करू? माझी भूमिकाच जर एका थोड्याशा बेजबाबदार व्यक्तीची आहे तर मी एखाद्या जबाबदार व्यक्तीप्रमाणे कसे वागू?
* अनुष्का आणि शरत यांच्यासोबत प्रथमच, काय वाटते?- अनुष्का खूपच कूल आणि मेहनती आहे. तिने माझी खूप मदत केली. शरतबद्द्ल जेवढे बोलेल तेवढे कमीच आहे. तो एक उत्तम लेखक आणि जाहिरात दिग्दर्शक असून बॅकग्राऊंड संगीत देण्यातही त्याचा हात कुणी धरू शकत नाही.
* तू इतका उत्स्फूर्त आणि अनुष्का एकदम शिस्तबद्ध. एकत्र काम करणं कठीण होतं का?- नाही. कारण आम्ही एकत्र वर्कशॉप्स केले आहेत. तिथे आम्ही पहिल्या दिवसापासून सोबत होतो. आम्ही एका टीममध्ये काम करत होतो. त्यामुळे फार काही वेगळं वाटलं नाही.
* तू तुझ्या भूमिकेक डून काय शिकलास?- मी ‘अक्टुबर’ आणि ‘जुडवा’ मध्ये ज्या गोष्टी केल्या त्यांचा मला या चित्रपटात फायदाच झाला. पोकर कॉमेडी आणि मनोरंजन करण्याच्या फंड्याने मला मदत केली.
* शिवणकाम शिकायला तूला किती कालावधी लागला?- सुरूवातीला मला ३ महिने साधारण शिवणकाम शिकायला लागले. पण, त्यात मास्टर व्हायला मला नंतरचे तीन महिने लागले. यशराज यांचे टेलर नूरभाई यांनी मला या भूमिकेसाठी खूप मदत केली. मी शिवणकामासाठी मापं घ्यायला शिकलो.
* तू अनुष्काला कधी चकित केलेस का?- मी तिला सायकलवर सोडले तेव्हा तिला चकित केले होते. एक ट्रेन सीन होता. ज्यात अनेक कलाकार गाणी गात होती. लोककलेवर आधारित गाणं आम्ही त्यासाठी शिकलो होतो. एकदा आम्ही गावात शूटिंग करत होतो. तेव्हा ती विनामेकअप आणि त्या कॉस्च्युम्समध्ये होती. काही वेळानंतर आम्ही तिला शोधू लागलो तर ती कुठेच दिसेना. अचानक माझं लक्ष गेलं आणि मी पाहिलं तर ती त्या महिलांमध्ये जाऊन बसली होती ज्या तिथे गाणी म्हणत होत्या. ती तिच्या भूमिकेत एवढी रममाण झाली होती की, आम्हाला ती अनुष्का आहे म्हणूनच ओळखू येत नव्हती.