बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल हे लव्हबर्ड्स काल अलिबाग येथे लग्नबंधनात अडकले. या शाही विवाह सोहळ्याचे सुंदर फोटो सध्या व्हायरल होत आहेत. साहजिकच हे फोटो दृष्ट लागावी इतके सुंदर आहेत.अलिबागेतील द मेन्शन हाऊस या अलिशान रिसॉर्टमध्ये अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडला. लग्नसोहळा अतिशय खासगी होता. सोहळ्यांचे फोटो लीक होऊ नयेत म्हणून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अगदी मोबाईल वापरण्यासही बंदी करण्यात आली होती. रात्री उशीरा वरूण व नताशाने लग्नाचे काही फोटो अधिकृतपणे आपल्या अकाऊंटवर शेअर केलेत. शिवाय लग्नानंतर वरूण व नताशा यांनी बाहेर येत मीडियाला पोज दिल्यात. बाहेर ताटकळत उभ्या असलेल्या मीडियाला मिठाई, लड्डू वाटण्यात आले. यावेळी सगळ्यांनी वरूण व नताशावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
वरूण व नताशाच्या लग्नसोहळ्यात करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, कतरिना कैफ, कियारा अडवाणी, जान्हवी कपूर, अनिल कपूर असे सगळे सहभागी झाले होते.
वरूण व नताशा एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून डेट करत आहेत. मात्र आत्ताआत्तापर्यंत दोघांनीही याचा कोणालाही थांगपत्ता लागू दिला नव्हता.
नताशा एक फॅशन डिझायनर आहे. 2013 मध्ये नताशाने फॅशन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजी न्यूयॉर्कमधून शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, तिने डिझायनिंग क्षेत्रातच काम सुरू केले.
तिचा स्वत: चा कपड्याचा एक ब्रँडही आहे, जो बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये खूप पसंत केला जातो. 16 मार्च 1989 मध्ये मुंबईत नताशाचा जन्म झाला होता. नताशा दलालच्या वडीलांचं नाव राजेश दलाल असून ते एक व्यावसायिक आहेत.