कलर्स मराठीवर सुरू असलेल्या योगयोगेश्वर जय शंकर (Yogyogeshwar Jai Shankar) मालिकेत आपण शंकर महाराजांनी केलेल्या अनेक लीला पाहत आहोत, अनेक भक्तांचा उद्धार त्यांनी कसा केला हे पाहिले, तर चुकलेल्या माणसांना योग्य मार्ग कसा दाखविला हे देखील पाहिले. पण, आता आपल्याला बघायला मिळत आहे सद्गुरू श्री शंकर महाराज यांचा न ऐकलेला, न वाचलेला अद्भुत आध्यात्मिक प्रवास. बाल शंकर ते शंकर महाराज हा प्रवास बघणे उत्सुकतेचे असणार आहे. दरम्यान आता या मालिकेत वीणा जगताप(Veena Jagtap)ची एन्ट्री झाली आहे. ती या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.
योगदायिनी पार्वती माता ही अखिल जगाची जननी, सर्व योग तिच्या ठायी आहेत, योगेश्वर आदिनाथाची ती अर्धांगिनी, लहानग्या शंकरला बालवयातच अंजनी, जगदंबा, अन्नपूर्णा या रुपात दर्शन व आशीर्वाद देऊन पुढील अखंड आयुष्याच्या यात्रेसाठी सक्षमता प्रदान केली. शंकरचा भारात भ्रमंतीचा आणि त्यानंतरचा पूर्ण प्रवास सुखकर करण्यासाठी माता पार्वतीने या लीला केल्या. मालिकेत आपल्याला लवकरच पार्वती मातेची पाच रूपं आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ते साकारणार आहे वीणा जगताप.
''स्वतःला खूप भाग्यवान समजते''
याबद्दल वीणा जगताप म्हणाली, "माझ्यासाठी हे खूप आव्हानात्मक आणि उत्सुकतेचे होते मी पहिल्यांदाच देवी रुपात तयार होऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे. इतकेच नव्हे तर त्यातही वेगवेगळी रूपं दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. खुपंच कठीण होतं हे माझ्यासाठी. एकतर पहिलीच वेळ होती बघताना खूप सोपं वाटतं आपल्याला पण ते साक्षात साकारणं तितकंच अवघड होतं. तयार होण्यासाठी लागणारा वेळ खूप होता. मला पहिले खूप भीती वाटतं होती जमेल की नाही पण मी भाग्यवान समजते स्वतः ला की मला हि संधी मिळाली. मला खात्री आहे प्रेक्षकांना देखील नक्की आवडेल."