नवी दिल्लीतून आनंदाची बातमी समोर येतेय. मराठीच नव्हे तर भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झालाय. काहीच दिवसांपुर्वी अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आता अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वांना आनंद झालाय.
संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची आज घोषणा झाली. या पुरस्कारांमध्ये अशोक सराफ यांना पुरस्कार जाहीर झालाच. शिवाय मराठमोळी अभिनेत्री ऋतूजा बागवे हिलाही संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. याशिवाय गायिका देवकी पंडीत यांनाही संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झालाय. नाट्यक्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल अशोक सराफ, ऋतुजा बागवे, देवकी पंडीत यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला. नवी दिल्लीच्या नॅशनल अकॅडमी ऑफ म्युझिक, डान्स व ड्रामा यांच्या संगीत नाटक अकादमीच्या वतीने हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
अशोक सराफ गेली अनेक वर्ष नाटक, सिनेमा क्षेत्रात कार्यरत आहेत. अशोक सराफ यांचं 'व्हॅक्यूम क्लिनर' हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजतंय. याशिवाय ऋतुजाची भूमिका असलेल्या 'अनन्या' नाटक रंगभूमीवर चांगलंच गाजलेलं. अपघातात हात गमावलेल्या अनन्याची प्रेरणादायी कथा या नाटकात दिसली. ऋतुजाला या नाटकामुळे अमाप लोकप्रियता मिळाली. याशिवाय देवकी पंडीत यांनी स्वरबद्ध केलेली गाणी रसिकांच्या पसंतीस उतरली आहेत.