ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक गोवर्धन असरानी, ज्यांची बॉलीवूडमधील कारकीर्द पाच दशकांहून अधिक काळ गाजवली आहे. ‘शोले’मधील अजरामर झालेलं जेलरचं पात्र ज्येष्ठ दिग्दर्शक गोवर्धन असरानी यांनी साकारलं होतं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अमिताभ बच्चन, राजेश खन्नासारख्या स्टार्सपासून गोविंदा, शाहरुख, अभिषेक बच्चनसारख्या वेगवेगळ्या अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे.
असरानी यांनी ३५० हून अधिक चित्रपटात काम केलं आहे.1972 ते 1991 दरम्यान राजेश खन्ना यांच्यासोबत 25 हून अधिक चित्रपटांमध्ये ते दिसले.‘बावर्ची’, ‘आप की कसम’, ‘अजनबी’ हे त्यापैकी काही गाजलेले चित्रपट. मध्यंतरी त्यांनी एका मुलाखतीमध्ये दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्याबद्दल खुलासा केला होता.
फिल्मफेअरला दिलेल्या या मुलाखतीमध्ये असरानी म्हणाले होते की, “मी राजेश खन्नाबरोबर ह्रषीदा यांच्या ‘नमक हराम’ या चित्रपटात काम केलं. त्यात राजेश खन्ना यांच्यासोबत अमिताभ बच्चनसुद्धा महत्वाच्या भूमिकेत होते. त्याआधी अमिताभ यांचे बरेच चित्रपट फ्लॉप झाले होते आणि ‘जंजीर’ हा चित्रपट अजून प्रदर्शित व्हायचा होता. त्या दोघांमध्ये वैमनस्य नव्हतं पण राजेश खन्नाची वृत्ती स्वतःचं वर्चस्व गाजवण्याची होती, त्यांना नेहमी वाटायचं कुणीही माझी जागा घेऊ शकणार नाही, आणि राजेश खन्नाच्या याच स्वभावामुळे त्यावेळेस चित्रपटाच्या सेटवर कायम चर्चा व्हायची.”
ते पुढे म्हणाले, “माझे राजेश खन्नांसोबत अनेक वर्षांपासून चागलं संबंध होते. पण त्यांचे कुणीच मित्र नव्हते. ते अशा लोकांसोबत राहणे पसंत करायाचे जे त्यांच्याविषयी चांगले बोलायचं. त्यांच्या कारकिर्दीला लागलेली उतरती कळा कधीच त्यांना जाणवली नाही. त्यांनी कधीच स्वतःमध्ये बदल केला नाही. शेवटपर्यंत त्यांचा स्वभाव तसाच राहिला.