Atul Parchure : मराठी अभिनेते अतुल परचुरे ( Atul Parchure ) यांचं वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झालं. चित्रपट, मालिका तसेच नाटक असा तिन्ही माध्यमात त्यांचा दांडगा वावर होता. काही वर्षांपूर्वीच परचुरे यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. 'कापूस कोंड्याची गोष्ट', 'नातीगोती', 'तरुण तुर्क म्हातारे अर्, व्यक्ती आणि वल्ली या नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका चर्चेत राहिल्या. याशिवाय 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमातही अतुल परचुरे यांनी बराच काळ काम केलं. 'अलिबाबा आणि चाळिशीतले चोर' हा अतुल परचुरेंचा शेवटचा सिनेमा ठरला.
दरम्यान, सोशल मीडियावर अतुल परचुरेंचा एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांना एक आवाहन केलं आहे. हा त्यांचा सोशल मीडियावरील शेवटचा व्हिडीओ होता. व्हिडीओमध्ये अभिनेत्याला पाहून नेटकरी देखील भावुक झाल्याचं पाहायला मिळतंय.
व्हिडीओमध्ये अतुल परचुरे म्हणाले, "नमस्कार, मी अतुल परचुरे. राज ठाकरेंचा गेल्या ४० वर्षांपासूनचा मित्र. राज यांनी कुठलाही निर्णय घेतला तर त्यांच्यावर चुहुबाजुंनी चर्चा होते. त्यांच्या बाजूने टीका केली जाते तर कधी त्यांच्या विरुद्ध टीका केली जाते. याबद्दल काही विचारू नका. याचं उदाहरण म्हणजे महायुतीत राज ठाकरे सामील होणार का? खरंतर, मला याबाबतीत काहीच कल्पना नाही. पण, काय होतं कित्येक वेळा बाहेर गेलो की लोकं मुद्दामहून बोलतात. काय हो! राज ठाकरे तुमचे मित्र आहेत ना तर त्यांना सांगा ना की त्यांचा हा निर्णय आम्हाला नाही पटला. त्यांचा हा प्रॉब्लेम आहे, त्यांचा तो तो प्रॉब्लेम आहे असं म्हणतात".
पुढे ते म्हणाले, "पण त्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे ते अतिशय उत्तम आणि सहृदयी स्वभावाचे आहेत. ज्यामुळे निर्णय घेताना त्यांच्यातील माणूस हा त्याच्यांतील राजकारण्यावर नेहमीच मात करत आला आहे. हे मी स्वानुभावरून सांगतो आहे. त्यामुळे त्यांचे कित्येक निर्णय आपल्याला नाही पटत आणि आपण टीका करतो. मला एकच सांगा, गेली १७-१८ वर्षे ते एकट्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धूरा ते आपल्या खांद्यावर वाहत आहेत. शिवाय आपल्यासाठी लढण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा त्यांच्यामागे शक्ती उभी करणं हे आपलं कर्तव्य आहे. संधी एकदाच द्या, पुन्हा नाही मागणार, म्हणून येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा". असं म्हणत अतुल परचुरेंनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.