Join us

"प्रसिद्धीच्या मागे पळू नका, काम करत राहा"; लोकप्रिय अभिनेते बोमन इराणी यांचा मोलाचा सल्ला

By श्रीकिशन काळे | Updated: February 16, 2025 21:14 IST

Boman Irani : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF) विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान

Boman Irani | श्रीकिशन काळे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: उत्तम अभिनेता व्हायचे असेल, तर स्वप्न समोर ठेवा आणि ते साध्य करण्यासाठी काम करा, प्रसिद्धीच्या मागे लागू नका. ती आपोआपच येईल, असा सल्ला आज प्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी यांनी दिला. २३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात( PIFF ) इराणी विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानात अभिनय या विषयावरील कार्यशाळेमध्ये बोलत होते. यावेळी महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, अभिनेते जितेंद्र जोशी उपस्थित होते.

बोमण इराणी म्हणाले, "कोणतीही गोष्ट एका रात्रीत घडत नसते. माझा दिग्दर्शक म्हणून मेहता बॉईज चित्रपट यायला १२ वर्षे लागली. शेवटी तुम्हाला काय हवे, हे महत्त्वाचे असते. ते तुम्हाला निश्चित करायला हवे. अभिनयाचेही असेच आहे. उत्तम अभिनय करण्यासाठी सतत काम करावे लागेल. ज्या चित्रपट अथवा नाटकात काम करायचे असेल, त्यांच्या पटकथेवर लक्ष द्या. अभिनय आणि पटकथा एकमेकांशी जोडलेल्या असतात. त्यामुळे अभिनय करताना केवळ तुमचा संवाद ज्याला गोल्डन वर्ड म्हणतात तो काय आहे, किंवा तुम्ही काय अभिनय करायचा आहे, यावर लक्ष देताना संपूर्ण पटकथा काय आहे, त्याच्या पुढे आणि मागे काय घडते, यावर लक्ष द्या. पटकथा लिहिण्याची प्रक्रिया काय असते, हेही समजून घ्यायला हवे. चित्रपट हे केवळ घटना नसतात तर ते माणसांची गोष्ट सांगत असतात. त्यामुळे उत्तम माणूस होणे, हेही गरजेचे आहे."

पटकथा कशी असावी, याविषयीही त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. "पटकथेमध्ये पहिल्या ७ ते ८ मिनिटात काहीतरी वेगळे घडायला हवे. पुढे २५ मिनिटात मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या व्यक्तिरेखेचा प्रवास सुरू होतो. मध्यानंतर मध्यवर्ती व्यक्तिरेखेने ननायकास अथवा परिस्थितीस आव्हान द्यायला हवे. पुढच्या भागामध्ये नायक अथवा मध्यवर्ती भूमिकेतून व्यक्ती ही संघर्ष गमावून बसते. पुढे ते नव्याने सुरुवात करतात. ज्याला डार्क नाईट ऑफ द सोल, असे म्हणतात आणि शेवटी मध्यवर्ती भूमिकेतून व्यक्ती आपले ध्येय साध्य करते, या क्रमाने पटकथा जायला हवी. दिग्दर्शक व्हायचे असेल, तरीही पटकथा कशी लिहिली जाते, हे शिकायला हवे. त्यामुळे उगाच बजेटबद्दल बोलू नका. चित्रपट तयार करताना तुमच्याकडे जे आहे, त्यात काय करता येईल, याचा विचार करा,” असेही इराणी म्हणाले.

टॅग्स :बोमन इराणीपुणेपीफबॉलिवूड