मुंबई : पन्नास वर्षांहून अधिक काळ चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ट्रॅजेडी किंग’ आणि अभिनयाचे शहेनशाह ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार बुधवारी काळाच्या पडद्याआड गेले. बुधवारी सकाळी साडेसात वाजता हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ९८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. सायंकाळी सांताक्रूझ येथील दफनभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. (veteran actor Dilip Kumar has passed away)
दिलीप कुमार यांना ६ जून रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुप्फुसात पाणी भरण्याचा त्रास त्यांना होत होता. पाच दिवसांच्या उपचारांनंतर, प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना ११ जून रोजी घरी सोडण्यात आले होते. ३० जून रोजी पुन्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, यावेळी त्यांच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि त्यांचे निधन झाले. हिंदुजा रुग्णालयातून त्यांचे पार्थिव वांद्रे येथील निवासस्थानी नेण्यात आले. तिथे चित्रपटसृष्टीसह अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
दिलीप कुमार यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांचे निकटवर्तीय फैजल फारुकी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. ते म्हणाले, मी जड अंत:करणाने सांगू इच्छितो की, आपले सर्वांचे लाडके दिलीप साहेब काही वेळापूर्वी आपल्याला सोडून गेले आहेत, आपण देवाकडून आलो आहोत तर आपल्याला पुन्हा तिथेच जायचे आहे.त्यांनी शंभर वर्षे जगावे, अशी आमची इच्छा होती.‘आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांनी १०० वर्षे पूर्ण करावीत, अशी आमची इच्छा होती. वयाच्या ९८व्या वर्षी प्रत्येक व्यक्तीला शरीरात अनेक समस्या उद्भवतात. डॉ. निखिल गोखले सतत दिलीप कुमार यांची काळजी घेत होते. सकाळी सायराबानोही त्यांच्यासोबत इस्पितळात होत्या.
डॉ. निखिल वीस वर्षांहून अधिक काळ त्यांच्यावर उपचार करत होते. आम्ही न्यूरोलॉजिस्ट आणि शल्यचिकित्सक यांच्यासोबत एकत्र येऊन त्यांच्यावर उपचार केले. त्यांच्यासारखा माणूस बॉलिवूडमध्ये क्वचितच जन्माला येईल. त्यांनी जगात भारताचे नाव उंचावले, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, असे डॉ. जलील पारकर म्हणाले.
साश्रुनयनांनी निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कारज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना बुधवारी त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांनी साश्रुनयनांनी निरोप दिला. सांताक्रुझ येथील दफनभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सायंकाळी पावणे चारच्या सुमारास अंत्ययात्रेला सुरुवात झाली. घरापासून काही पावलांवर पार्थिव आणल्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे थेट दफनभूमीत नेण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्ययात्रेला गर्दी होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली. दिलीप कुमार यांचे कुटुंबीय आणि काही निवडक व्यक्तींनाच आत जाण्याची परवानगी देण्यात आली.
अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन अंत्यसंस्कार वेळी उपस्थित होते. या सदाबहार अभिनेत्याचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी सलामी दिल्यानंतर ‘सुपूर्द-ए-खाक’ हा रिवाज पार पडला. यावेळी दफनभूमीबाहेर गर्दी केलेल्या हजारो चाहत्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.