दिग्गज अभिनेते रमेश देव Ramesh Deo यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. नुकतंच ३० जानेवारी रोजी त्यांनी आपल्या वयाची ९३ वर्षे पूर्ण केली होती. रमेश देव यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी याबाबत माहिती दिली. मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या चित्रपटसृष्टीला समर्पित केलं होतं. रमेश देव यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.
रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ रोजी कोल्हापुरात झाला. त्यांनी आंधळा मागतो एक डोळा या चित्रपटातून या क्षेत्रात पदार्पण केलं. तर आरती या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यांनी दिग्दर्शनासहित अनेक मालिका आणि नाटकांचीही निर्मिती केली आहे. २०१३ मध्ये ११ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रमेश देव यांना लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डनं गौरवण्यात आलं होतं.रमेश देव यांनी मराठी तसंच हिंदी भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये अभिनय साकारला आहे. १९६२ मध्ये रमेश देव यांचा नलिनी सराफ (सीमा देव) यांच्याशी विवाह झाला. या दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका साकारल्या. पाटलाचं पोर,सुवासिनी, झेप, सर्जा, या सुखांनो या, आनंद, कसौटी, फटाकडी, जय शिवशंकर, तीन बहुरानीयाँ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.