Join us

ज्येष्ठ अभिनेते नंदू पोळ यांचे निधन

By admin | Published: July 28, 2016 10:43 AM

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नंदू पोळ यांचे गुरूवारी सकाळी निधन झाले.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २८ - मराठी रंगभूमी तसेच सिनेक्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत नंदू पोळ यांचे गुरुवारी निधन झाले.  पुण्यातील खासगी रुग्णालयात पोळ यांच्यावर उपचार सुरु होते. गुरुवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६८ वर्षांचे होते.  
 
त्यांनी अनेक चित्रपट, मालिका तसेच नाटकातून आपल्या अभिनयाचे प्रेक्षकांची मने जिंकली होती. सिंहासन, सामना, एक होता विदूषक, नागिन, एक डाव भुताचा, कथा दोन गणपतरावांची, पक पक पकाक, दुर्गे दुर्गट भारी, गाढवाचं लग्न, इसराल गावाची इसराल माणसे, हसतील त्यांचे दात दिसतील या चित्रपटांतून त्यांनी काम केले होते. 
 
तसेच अनेक टीव्ही सीरियल्स आणि मालिकातूनही त्यांनी अभिनयाची चुणूक दाखवली. नाजुका, प्रवासी, अडोस-प़डोस, मुक्ती, पिंपळपान, अकलेचे तारे, कायपालट यासारख्या मालिका-टीव्ही सीरियल्समध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.
 
वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे बालवयातच नंदू पोळ यांनी  'साष्टांग नमस्कार' नाटकापासून अभिनयाचा प्रवास सुरू केला. तसेच ते 'थिएटर ॲकॅडमी'चेही एक संस्थापक-सदस्य होते.  ध्वनिमुद्रण तंत्रज्ञ असलेल्या पोळ यांनी स्वत:चा स्टुडिओही काढला होता.