Sanjeev Kumar Birth Anniversary : बॉलिवूडचा ठाकूर म्हणजेच अष्टपैलू कलाकार संजीव कुमार.संजीव कुमार (Sanjeev Kumar ) आज आपल्यात नाहीत. ६ नोव्हेंबर १९८५ रोजी हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. आज संजीव कुमार आठवण्याचं कारण म्हणजे, १९३८ मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे ९ जुलैला त्यांचा जन्म झाला होता. आज त्यांचा वाढदिवस.
संजीव कुमार यांचं खरं नाव हरीभाई जरीवाला होतं. ‘नया दिन नयी रात’ या चित्रपटात त्यांनी नऊ भूमिका साकारल्या होत्या. ‘कोशिश’ या चित्रपटातील त्यांनी साकारलेली मूक व कर्ण बधिर व्यक्तीची भूमिकाही गाजली होती.
आपल्या फिल्मी करिअरमध्ये संजीव कुमार यांनी अनेक लहान भूमिका केल्यात. कुठलीही भूमिका स्वीकारताना ते घाबरले नाहीत. त्याचमुळे कधीकाळी जया बच्चन यांच्या प्रियकराची, पतीची भूमिका साकारणाऱ्या संजीव कुमार यांनी पुढे जया यांच्या सासऱ्यांची आणि वडिलांचीही भूमिका साकारली. ‘त्रिशूल’ या चित्रपटात संजीव कुमार यांना अमिताभ व शशी कपूर या समकालीन अभिनेत्यांच्या पित्याची भूमिका ऑफर झाली. संजीव कुमार यांनी तीही स्वीकारली. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी एका वृद्धाची भूमिका साकारली होती. त्यांना त्या भूमिकेत पाहून पृथ्वीराज कपूर थक्क झाले होते.
संजीव कुमार अनेकदा प्रेमात पडले. पण त्यांनी कधीच लग्न केलं नाही. एका विचित्र योगायोगामुळे ते आजन्म अविवाहित राहिले. होय, त्यांनी लग्न न करण्यामागे एक खास कारण होतं. त्यांच्या कुटुंबातील मोठा मुलगा दहा वर्षांचा झाला की, त्याच्या वडिलांचा मृत्यू होत असे. हा योगायोग होता की अंधश्रद्धा ते ठाऊक नाही. पण संजीव कुमार यांच्या वडिलांसोबत आणि भावासोबत हेच घडलं होतं.
संजीव कुमार जेव्हा १० वर्षांचं झाले तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झालं. त्यांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडिलही अशाचप्रकारे त्यांचा मुलगा दहा वर्षांचा झाल्यावर गेले होते. संजीव कुमार यांच्या दोन भावांसोबतही हेच घडलं होतं. संजीव कुमार यांच्या मनात ही भीती घर करून बसली होती. असं म्हणतात की, त्यामुळे संजीव कुमार यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. अर्थात त्यांनी आपल्या मोठ्या भावाच्या मुलाला दत्तक घेतलं होतं. पण हा दत्तक पुत्र १० वर्षांचा होताच, दुर्दैवानं संजीव कुमार यांचाही मृत्यू झाला.
संजीव कुमार यांनी लग्न न करण्यामागे आणखी एक कारण सांगितलं जातं. होय, असं म्हणतात की, ज्या महिलांसोबत संजीव यांचं अफेअर राहिलं त्या सर्वांवर त्यांचा कधीच पूर्ण विश्वास नव्हता. त्या सगळ्या माझ्यावर नाही तर माझ्या पैशांवर प्रेम करतात, असंच त्यांना वाटायचं. या एका कारणामुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही़.
मृत्यूची भीती त्यांना कायम छळायची. मी लवकर जाणार, असं ते आपल्या जवळच्यांना नेहमी म्हणत आणि झालंही तसंच. उण्यापुऱ्या वयाच्या ४७ व्या वर्षी ते सर्वांना सोडून गेलेत.