Join us  

ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर जयंती

By admin | Published: November 01, 2016 11:48 AM

चेहऱ्यावरील भावातुनच विनोद आणि वेदना दाखविणारे ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांची आज ( १ नोव्हेंबर) जयंती.

- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. १ - चेहऱ्यावरील भावातुनच विनोद आणि वेदना दाखविणारे ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांची आज ( १ नोव्हेंबर) जयंती.  विनोदी अभिनेता म्हणून अभिनय करतानाच, दु:खद प्रसंगातही हेलावून टाकणारे भाव ते तितक्याच ताकदीने मांडत असत.
शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. शालेय जीवनात म्हणजे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐनवेळेस रणदुंदुंभी नाटकातील शिशुपाल आणि साष्टांग नमस्कार या नाटकातील भद्रायु भाटकर ही पात्र त्यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगविली होती. इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली.
 
कित्येकदा लहान-मोठी किंवा अगदी पडदा उघडताना ऐनवेळी अशा भूमिका रंगवून त्यांनी आपले नाव नाट्यवर्तुळात सर्वतोमुखी केले. पुढे केशवराव दात्यांच्या ‘नाट्यविकास’ मंडळीत त्यांनी नोकरी केली. छापील संसार नावाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. हा अभिनयाचा छंद जोपासत असताना त्यांनी ‘मिलिटरी अकाउंट्‌स’ मध्ये नोकरी केली. त्यावेळेस त्यांचे शिक्षणही सुरू होते.
 
विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता 'माझा मुलगा',  तिथून सुरू झालेला विनोदी अभिनेत्याचा प्रवास शेवटपर्यंत सुरूच होता. नाट्य आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रांत त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रभाव पाडला होता. बालगंधर्वांसारख्या नटश्रेष्ठाबरोबर एकच प्यालातील रंगवलेली तळीरामाची भूमिका बालगंधर्वांच्या शाबासकीला पात्र ठरली. लग्नाची बेडी या नाटकातला गोकर्ण शरद तळवलकरांनी आपल्या ठसकेबाज शैलीत रंगवून अविस्मरणीय केला. पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्यनिर्माते म्हणून केलेले त्यांचे कार्य मोलाचे होते. त्यांच्या काळातील नभोनाट्ये हा श्रोत्यांच्या आवडीचा विषय होता. ‘कलाकार’ ही नाट्यसंस्था त्यांनी उभारली.
 
मुंबईचा जावई या चित्रपटात त्यांनी केलेली भूमिका वास्तवाशी निगडित असून खूपच सुंदर होती अतिशय बोलक्या चेहर्‍याच्या ह्या विनोदी कलावंताला नाट्यसृष्टीत मानाचा समजला जाणार्‍या विष्णुदास भावे पुरस्काराने गौरविले गेले.
 
२१ ऑगस्ट २००१ साली त्यांचे निधन झाले. 
 
सौजन्य : मराठी विकिपीडिया