Join us  

ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचे निधन

By admin | Published: August 06, 2014 8:04 AM

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि निर्मात्या स्मिता तळवलकर यांचे निधन झाले.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ६ - चौकट राजा, तू तिथे मी, ऊनपाऊस अशा चित्रपटांमधील दर्जेदार अभिनयाने मराठी सिनेसृष्टीवर छाप पा़डणा-या ज्येष्ठ अभिनेत्री आणि निर्मात्या स्मिता तळवलकर यांचे कर्करोगाने निधन झाले. त्या ५९ वर्षाच्या होत्या. त्यांच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते, तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात स्मिता तळवलकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी दादर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

काही वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले होते, मात्र त्याने खचून न जाता त्यांनी या आजाराशी निकराने लढा दिला. उपचार सुरू असतानाचा दुसरीकडे त्यांचे कामही सुरू होते. मात्र अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. 

वृत्तनिवेदिका म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरूवात करणा-या स्मिता तळवलकर यांनी मराठी रंगभूमी, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला होता. 'कळत नकळत' या  चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 'अस्मिता चित्र'च्या बॅनरखाली त्यांनी अनेक चित्रपट व मालिकांची निर्मिती व दिग्दर्शन केले.  त्यांचे 'चौकट राजा', 'कळत नकळत', 'सवत माझी लाडकी', 'तू तिथे मी', 'सातच्या आत घरात' हे चित्रपट तर 'अवंतिका', 'ऊन पाऊस' या मालिका विशेष गाजल्या. त्यांनी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या प्रमुख कार्यवाहपदही भूषवले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही स्मिता तळवलकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. 'तळवलकर यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. तळवलकर यांच्या आत्म्यास शांती लाभो.' अशी प्रार्थनाही त्यांनी केली. 

मान्यवरांच्या प्रतिक्रिया

स्मिता तळवलकर यांच्याकडून खूप शिकायला मिळाले, त्यांच्या निधनामुळे अतिशय दु:ख झाले आहे. त्यांच्या 'अवंतिका' मालिकेने मला एक नवी ओळख मिळवून दिली.मी आयुष्यभर त्यांच्याकडून काही ना काहीतरी शिकत आले आणि यापुढेही शिकत राहीन. - अभिनेत्री मृणाल कुलकर्णी 

माझं पहिल काम मला तिने मला दिलं, ती माझ्यासाठी माझ्या आईसारखी होती. आम्हा दोघांपैकी कोणीही कुठेही बाहेर गोले, तरी एकमेकांसाठी आठवणीने एखादी गोष्ट आणायचो. मी एकदा तिच्यासाठी आणलेली साडी तिने कौतुकाने एका मालिकेत नेसली होती. तिच्या जाण्यामुळे माझे खूप मोठे वैयक्तिक नुकसान झाले आहे. - अभिनेता सुबोध भावे

 

स्मिता तळवलकर यांचे चित्रपट 
- तू सौभाग्यवती हो (१९८६)
- गडबड घोटाळा (१९८६)
- कळत नकळत (१९८९) 
- चौकट राजा (१९९१) 
- सवत माझी लाडकी (१९९३)
- शिवरायाची सून ताराराणी (भूमिका: येसुबाई, १९९३) 
- तू तिथे मी (१९९८)
- सातच्या आत घरात (२००४)
- आनंदाचे झाड (२००६)
- चेकमेट (२००८)
- टोपी घाला रे (२०१०)
- अडगुळ मडगुळ (२०११)
- एक होती वाडी (२०११)
- जन्म (२०११)
- श्यामचे वडील (२०१२)
- या गोल गोल डब्यातला (२०१२)
- प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं (२०१३)
 
मालिका
- घरकुल
- पेशवाई
- अवंतिका
- ऊन पाऊस
- कथा एक आनंदीची
- अर्धांगिनी
- सुवासिनी
- उंच माझा झोका
 
नाटकं
- गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, भूमिका - जनाबाई
 
स्मिता तळवलकर यांना मिळालेले पुरस्कार
- राष्ट्रीय पुरस्कार - कळत नकळत (१९८९)
- राष्ट्रीय पुरस्कार - तू तिथे मी (१९९८)
-  महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार - सवत माझी लाडकी (१९९२)
- महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा ग.दि.मा पुरस्कार - तू तिथे मी 
- महाराष्ट्र शासनाचा व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार (२०१०)