Join us

कॅरेक्टर आवडलं अन् मी प्रेमात पडलो... मला काही प्रुव्ह करायचं नाही, माझ्यासाठी गाणं सगळ्याचं मूळ!

By अमेय गोगटे | Published: March 17, 2024 10:13 AM

राहुल देशपांडे यांची ‘अमलताश’च्या निमित्ताने 'लोकमत'ला विशेष मुलाखत

अमेय गोगटे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भारतीय शास्त्रीय संगीताचा वारसा समर्थपणे पुढे नेत असतानाच काही हटके प्रयोगांनी मराठी रसिकांची मनं जिंकणारे राहुल देशपांडे यांचं अभिनयकौशल्यही आपण ‘मी वसंतराव’मध्ये पाहिलं. मात्र, त्यांच्याआधी त्यांनी एका सिनेमात काम केलं होतं. तो त्यांचा पहिला सिनेमा म्हणजे ‘अमलताश’. ८ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित झाला असून राहुल - कीर्तीची ही हळुवार संगीतमय प्रेमकथा प्रेक्षकांना भावतेय. त्याबद्दल राहुल देशपांडेंशी गप्पा मारल्या. लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

  • नाटकामुळे अभिनयाचा अनुभव होताच. पण कॅमेरा, चित्रपट हे सगळं कसं जुळून आलं आणि कसं जमवलं?

२०१५-१६ साली मी ऑडिओ ब्लॉग करायचो. ‘अमलताश’चे दिग्दर्शक सुहास देसले यांची ती संकल्पना होती. आम्ही ३०-४० एपिसोड केले. खूप छान प्रतिसाद होता. पण, व्हिडीओ ब्लॉगवरून आमच्यात थोडे ‘सुख संवाद’ झाले आणि मग ऑडिओ ब्लॉगही बंद केला. त्यानंतर, काही महिन्यांनी सुहास सिनेमाची स्क्रिप्ट घेऊन आला. म्हणाला, तुझ्यावर लिहिलीय, म्युझिकल आहे. तेव्हा मी फिल्म करेन असं वाटलं नाही. कारण, फिल्म करणं काय असतं, किती पैसे लागतात वगैरे काहीच माहीत नव्हतं. पण, जे सोबत होते त्यात गिफ्टेड फोटोग्राफर होते. टॅलेंट घरात आहे, कॅमेरा घरातच आहे, तर करूया असा विचार केला. मित्रांनीही धुरा उचलली आणि फिल्म झाली.

  • स्क्रिप्ट वाचल्यावर काय क्लिक झालं? गाणी, स्टोरी, कॅरेक्टर?

‘अमलताश’मधलं कॅरेक्टर इतकं क्लीअर आहे. बहीण, मित्र, कुटुंब आणि संगीत. माझं आयुष्य एवढंच आहे. याच्या पलीकडे मला ना कुणाकरता किंवा माझ्याकरता काहीही कुणाला प्रूव्ह नाही करायचंय. ते कॅरेक्टर आवडलं. त्याच्या प्रेमात पडलो. 

  • गाणं आणि अभिनय या दोन्ही परफॉर्मिंग आर्ट्स स्टेजवर आणि कॅमेऱ्यासमोर सादर करण्याचा अनुभव तुमच्याकडे आहे. त्याबद्दल काय सांगाल?

माझ्यासाठी गाणं सगळ्याचं मूळ आहे. मी जे व्यक्त करायचा प्रयत्न करत असतो, माझे आजोबा कायम म्हणायचे की, संगीताला तीन डायमेन्शन असतात. सूर, लय आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा अभिनय. अभिनय म्हणजे काय तर, एखादी गोष्ट आतपर्यंत पोहोचल्यानंतर जे तुमच्या पूर्ण व्यक्तिमत्त्वातून बाहेर पडतं ती गोष्ट. अभिनय नक्कीच सोपा नाही. त्याचं एक तंत्र आहे. पण त्याचा जो बेस आहे तो माझ्यासाठी म्युझिक आहे.

  • ‘अमलताश’च्या संगीतामध्ये काय वेगळा प्रयोग केलाय?

प्रभातच्या काळात प्लेबॅक नव्हता. जे सेटवर चालायचं तेच रेकॉर्ड व्हायचं. इथे मुद्दामहून वादक कलाकारांचं जॅमिंग झालं. ३०-३० मायक्रोफोन असायचे. जे तिथे लाइव्ह गायलो तेच पिक्चरमध्ये आहे. त्यामुळे ते इतकं पर्सनल वाटतं की ही घटना आपल्यासमोर घडतेय आणि आपण याचा एक भाग झालोय.

(राहुल देशपांडे यांची संपूर्ण मुलाखत ‘लोकमत’च्या यू-ट्यूब चॅनलवर पाहता येईल.)

टॅग्स :राहुल देशपांडेमराठी चित्रपटहिंदुस्तानी शास्त्रीय संगीत