मराठी सिनेसृष्टीत अस्सल मातीतल्या इरसाल विनोदाने दोन दशके प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या दादा कोंडके यांनी आपल्या नावाप्रमाणे मराठी सिनेविश्वात खऱ्या अर्थाने दादागिरी गाजवली. विनोदी सिनेमा म्हणजे काय आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या रोजच्या प्रसंगांमधून विनोद कसा फुलतो याची अचूक जाण असलेल्या दादांनी जरी मराठी सिनेमासृष्टीत एक काळ गाजवला असला तरी दादांचे बालपण अत्यंत कष्टात आणि संघर्षात गेले. बागडण्याच्या वयात दादांना अनेक गोष्टींसाठी मनाला मुरड घालावी लागली होती, पण रडत बसण्यापेक्षा हसत आणि हसवत राहण्याचा मंत्र दादांनी जपला. एका गिरणी कामगाराचा मुलगा ते यशस्वी अभिनेता, दिग्दर्शक ही ओळख दादांनी कमावली ती जिददीच्या जोरावर. गेल्या ६ ऑगस्टपासून झी टॉकीज वाहिनीवर ज्युबिली स्टार दादांना त्यांचे सुपरहिट सिनेमे प्रेक्षकांना दाखवून मानाचा मुजरा करण्यात येत आहे. दादांच्या ९१ व्या जयंती निमित्त इरसाल विनोदाचे ढग भरून मनोरंजनाचा धुवाधार पाऊस बरसणार आहे.येत्या रविवारी २० ऑगस्टला ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या ’ हा चित्रपट दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता झी टॉकीज वर पहायला मिळणार आहे. झी टॉकीज प्रेक्षकांसाठी नेहमीच काहीतरी वेगळं आणि खास मनोरंजन घेऊन येत असते. मराठी सिनेमाला विनोदी चित्रपटांचा सुवर्णकाळ दाखवणाऱ्या, मराठी मातीतील अस्सल गावरान सिनेमातून रांगडा नायक लोकप्रिय करणाऱ्या दादा कोंडके यांच्या गाजलेल्या सिनेमांची मालिका सलग सहा रविवारी प्रेक्षकांसाठी झी टॉकीजने आणली आहे. यानिमित्ताने दादा कोंडके यांच्या अनेक आठवणींनाही उजाळा मिळणार आहे.
दादा कोंडके यांचा जन्म मुंबईतल्या नायगावात कृष्णाष्टमीला झाला. साहजिकच आईवडिलांनी बाळाचे नाव कृष्णा ठेवले. पण या नावाने त्यांना ना आई वडीलांनी कधी हाक मारली ना त्यांच्या चाहत्यांनी. दादांचा जन्म झाला तेव्हापासून त्यांची शरीरयष्टी किरकोळ होती. दिवस उजाडला की काही ना काही कारणाने हा छोटा कृष्णा आजारी पडायचा. दादांच्या भावाचे आरोग्यही फार काही चांगले नव्हते. लहानग्या कृष्णाची आई काळजीत पडली. गिरणी कामगार असलेल्या वडिलांनाही काही सुचेना. मग कुणीतरी त्यांना सांगितले की मुलाला नावाने हाक मारू नका, त्याला तात्या, सोन्या, दादा, आण्णा असं काहीतरी नाव द्या. मुलाच्या काळजीपोटी मग कृष्णाच्या ऐवजी दादा अशी हाक मारली जाऊ लागली आणि हेच नाव त्यांच्यासोबत आयुष्यभर राहिलं. नायगावात दादांचं बालपण गेलं. वाद्याची आवड होती, त्यातूनच एका बँड पथकात दादांची कलाकारी बहरली. त्यानंतर राष्ट्रसेवादलाशी संपर्क आला आणि त्यातून त्यांना अभिनय, गाणं या कलेचा सूर सापडला. पुढे भालजी पेंढारकर यांनी दादांमधील अभिनय गुण ओळखले आणि त्यांना 'तांबडी माती' या सिनेमात भूमिका करण्याची संधी दिली. हा सिनेमा फार चालला नाही पण दादांना अभिनयाची नस सापडली. दादांनी स्वतः सोंगाड्या या सिनेमाची निर्मिती केली आणि त्यानंतर दादा कोंडके आणि सिनेमाचा रौप्य महोत्सव हे समीकरण कायमचं जोडले गेलं.
ज्या दादांनी आयुष्यभर सर्व मराठी प्रेक्षकांना निखळ हास्याची मेजवानी दिली त्या दादांच्या खऱ्या आयुष्यात जन्मानंतरच्या एका महिन्यातच खराखुरा विनोद घडला होता. दादा जन्मताच इतके अशक्त होते की ते किती दिवस जगतील ही शंकाच होती. दादांच्या जन्मानंतर काही दिवसांनी त्यांचे मामा बाळाला पाहायला दादांच्या नायगावातल्या घरी आले. भाऊ आला म्हणून दादांच्या आईने दादांच्या वडीलांना त्यांच्या गिरणीवर सांगावा दिला. लवकर घरी या, असा निरोप मिळताच दादांच्या वडीलांना वाटले की बाळाचे काही बरेवाईट झाले की काय? दादांचे गिरणीतील काही सहकारीही त्यांच्यासोबत होते. दादांच्या वडीलांच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून ते सहकारीही दादांच्या वडीलांसोबत घरी आले. सर्वांना असंच वाटलं की लहानग्या दादांची तब्येत बिघडली असेल किंवा त्यांच्याबाबतीत काही दुर्दैवी घडले असेल. दादा फार दिवस जगणार नाहीत असं वैद्यकीय निदान दादांच्या वडीलांना माहित होतं त्यामुळे ते घरी येईपर्यंत उदासच होते. पण घरी आल्यावर दादांच्या वडीलांना दादांच्या आईने लवकर घरी बोलवण्याचे खरे कारण सांगताच जो काही हशा पिकला त्याने घरातील वातावरणच बदलून गेलं. पुढे मराठी सिनेमाला सहजसुंदर निखळ विनोदाने प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या दादांच्या खऱ्या आयुष्यातील हा पहिला विनोद दादांमधील विनोदवीराची चुणूक होती हे नक्की.