गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या देशभरातील संगीतप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. दीदींच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून त्यांना आता कृत्रिम श्वसनयंत्रणेची आवश्यकता भासत नसल्याची दिलासादायक माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून लतादीदींवर ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. परंतु, दीदींकडून उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानं त्यांची तब्येत वेगानं सुधारतेय आणि त्यांना लवकरच घरी सोडलं जाऊ शकतं.
डॉ. प्रतीत समधानी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेली अनेक वर्षे सततच्या गायनामुळे, तसेच वयोमानामुळे लता मंगेशकर यांच्या फुप्फुसाच्या क्षमतेवर काहीसा परिणाम झाला आहे. लता दीदींची प्रकृती स्थिर असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत अशी माहिती वेळोवेळी त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात येत होती. दीदी लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी संपूर्ण देशभरातून प्रार्थना केल्या जात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लतादीदींच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली होती. अलीकडेच २८ सप्टेंबर रोजी लतादीदींनी आपला ९० वा वाढदिवस साजरा केला आहे
लता मंगेशकर यांनी हिंदी सिनेमात हजारो गाणी गायली आहेत. आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कार तसेच प्रतिष्ठेच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.