Join us

CoronaVirus : विकी कौशलने दान केली इतकी मोठी रक्कम, सगळेच करतायेत त्याचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 3:55 PM

अभिनेता विकी कौशलने पंतप्रधान सहाय्यक निधीत मदत केली असून त्याने एक भली मोठी रक्कम दान केली आहे.

ठळक मुद्देविकी कौशलने लिहिले आहे की, मी खूपच भाग्यवान आहे की, सध्या मी माझ्या कुटुंबियांसोबत माझ्या घरात वेळ घालवत आहे. पण माझ्यासारखे सगळेच भाग्यवान नसतात. मी माझ्याकडून पंतप्रधान सहाय्यक निधीला आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला मिळून एक करोड रुपये देत आहे.

कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे सामान्य लोकच नव्हे तर अनेक सेलिब्रेटी देखील आपल्या घरातून बाहेर पडत नाहीयेत. प्रत्येकाने घरातच राहावे असे आवाहन लोकांना केले जात आहे. देशात परिस्थिती अतिशय भयाण असून अनेकजण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता अभिनेता विकी कौशलने पंतप्रधान सहाय्यक निधीत मदत केली असून त्याने एक भली मोठी रक्कम दान केली आहे.

विकी कौशलने एक कोटी रुपयांची मदत केली असून त्यानेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट सांगितली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यात लिहिले आहे की, मी खूपच भाग्यवान आहे की, सध्या मी माझ्या कुटुंबियांसोबत माझ्या घरात वेळ घालवत आहे. पण माझ्यासारखे सगळेच भाग्यवान नसतात. या अतिशय वाईट काळात मी माझ्याकडून पंतप्रधान सहाय्यक निधीला आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला मिळून एक करोड रुपये देत आहे. आपण सगळ्यांनी मिळून या संकटाचा सामना करूया...

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जगभरात अनेक ठिकाणी लोकांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. काहीजणांचे तर खाण्याचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक गरीब लोकांवर तर उपाशी राहाण्याची वेळ आली आहे. 

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी मदत करण्यासाठी पुढे आले असून वरुण धवन, भुषण कुमार, राजकुमार राव, कपिल शर्मा, वरुण धवन, शिल्पा शेट्टी यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीत काही लाखांची मदत केली आहे. अभिनेता अक्षय कुमारने तर 25 कोटींची मदत केली असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

टॅग्स :विकी कौशलकोरोना वायरस बातम्या