ठळक मुद्दे तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे'सरदार उधम सिंग' हा सिनेमा भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच्या काळातील आहे
उरी सिनेमाच्या रिलीजनंतर विकी कौशल रातोरात स्टार झाला. सध्या विकी कौशलचे नशीब चांगलेच जोरावर आहे कारण उरीनंतर अनेक सिनेमांच्या ऑफर विकीकडे आल्या. सध्या विकी आपला आगामी सिनेमा 'सरदार उधम सिंग'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमातील विक्कीचा फर्स्ट लूक रिलीज झाला होता.
लूक रिलीज झाल्यानंतर विकीचे फॅन्स 'उधम सिंग'च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. सिनेमा व्यापर विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. उधम सिंग 2 ऑक्टोबर 2020ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शूजीत सरकार दिग्दर्शित सरदार उधम सिंगमध्ये विकी खूपच भूमिका साकारताना दिसणार आहे. 'सरदार उधम सिंग' हा सिनेमा भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच्या काळातील आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अशाच एका स्वातंत्र्य सैनिकाची गोष्ट आपल्याला 'सरदार उधम सिंग' या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
सरदार उधम सिंग या चित्रपटात उधम सिंगची व्यक्तिरेखा पहिल्यांदा इरफान खान साकारणार होता. पण इरफानने आजारपणामुळे हा चित्रपट करण्यास नकार दिला. त्यामुळे या भूमिकेसाठी विकीची निवड करण्यात आली.
या चित्रपटातील मुख्य भूमिकेत विकीची निवड करण्याविषयी या चित्रपटाचे दिग्दर्शक शूजीत सरकार सांगतात, विकीच्या आजवरच्या कारकिर्दीकडे तुम्ही पाहिले, तर तुमच्या लक्षात येईल की तो नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्याला प्राधान्य देतो. या भूमिकेसाठी पूर्णपणे झोकून देईल असा कलाकार मला या चित्रपटासाठी हवा होता आणि त्यात या चित्रपटात एका पंजाबी मुलाची कथा दाखवण्यात येणार आहे आणि विकी हा पंजाबी आहे. याच कारणांमुळे मी या भूमिकेसाठी विकीला घेण्याचे ठरवले.