Join us  

शूटिंगदरम्यान जखमी झाला 'छावा', विकी कौशलच्या हाताला दुखापत; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 1:12 PM

विकी कौशल आगामी 'छावा' या ऐतिहासिक सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे.

सिनेमात काम करताना सेटवर अनेकदा दुर्घटना घडते. यामुळे अनेकदा कलाकारांना काही ना काही दुखापतीला सामोरं जावं लागतं. कधी ही दुखापत खूपच किरकोळ असते तर कधी अगदी गंभीरही असते. 'कुली' सिनेमावेळी अमिताभ बच्चन यांच्यासोबत घडलेली दुर्घटना तर सर्वश्रुतच आहे. त्यावेळी बिग बी अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून परत आले होते. नुकतंच अभिनेता विकी कौशललाही (Vicky Kaushal) सेटवर दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. हाताला प्लास्टर बांधून विकी कारमधून उतरताना दिसला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

विकी कौशल आगामी 'छावा' या ऐतिहासिक सिनेमात काम करत आहे. यामध्ये तो छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. दरम्यान सिनेमाच्या सेटवर एक अॅक्शन सीक्वेन्स सीन शूट करताना विकीला दुखापत झाली. त्याच्या डाव्या हाताला मार लागला असून हात फ्रॅक्चर असल्याचंही दिसतंय. त्याचा हात बांधलेला असून काही दिवस आरामाचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. नुकताच विकीचा घराखाली कारमधून उतरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. चाहते त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमासाठी गेल्या काही दिवसांपासून विकी त्याच लूकमध्ये दिसत आहे. त्याने दाढी वाढवलेली आहे तसंच शरीरयष्टीतही बदल केले आहेत. सिनेमात रश्मिका मंदाना ही येसुबाईंची भूमिका साकारत आहे. हा एक अॅक्शन पीरियड सिनेमा असणार आहे. रश्मिकाने नुकतंच सिनेमाचं शेड्युल पूर्ण केलं. तिने सहकलाकारांसाठी एक भावूक पोस्ट लिहिली जी व्हायरल झाली होती. 

या ऐतिहासिक सिनेमात विकीचा अभिनय पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. विकी कायमच त्याच्या अभिनयाने चाहत्यांना प्रभावित करतो. त्यामुळे याही सिनेमाकडून चाहत्यांना अपेक्षा आहेत. विकी पहिल्यांदाच ऐतिहासिक सिनेमात काम करत असल्याने त्याच्यासाठी सुद्धा ही सुवर्णसंधी आहे. 

टॅग्स :विकी कौशलअपघातसिनेमाबॉलिवूडसोशल मीडिया