'छावा' सिनेमा आज सगळीकडे रिलीज झाला आहे. विकी कौशलने (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. शंभूराजांच्या लूकमध्ये विकी अगदी शोभून दिसला आहे. सध्या सिनेमा पाहून प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही चांगल्या येत आहेत. विकी कौशल जरी हिंदी भाषिक असला तरी त्याला मराठी चांगली येते. सिनेमातही ते काही डायलॉग्समधून दिसून आलं आहे. विकीचा जन्म मुंबईत मालाड येथील चाळीत झाला. तिथेच तो मोठा झाला त्यामुळे तो चांगलं मराठी बोलतो. नुकतंच त्याने एका मुलाखतीत त्याचा आवडता मराठी सिनेमा, आवडतं मराठी गाणं कोणतं याचा खुलासा केला.
'छावा' च्या निमित्ताने विकी कौशलने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. 'मिर्ची प्लस'ला दिलेल्या मुलाखतीत विकीला मराठीविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्याला सैराट सोडून आवडता मराठी सिनेमा कोणता? असं विचारण्यात आलं. यावर त्याने नागराज मंजुळेंच्याच 'फॅन्ड्री' सिनेमाचं नाव घेतलं. यानंतर त्याला आवडतं मराठी गाणंही विचारण्यात आलं. त्यावर त्याने अजय-अतुलचं 'वाट दिसू दे' गाण्याचं नाव घेतलं. तो म्हणाला, 'मला ते गाणं खूप आवडतं. गिरीश कुलकर्णी सरांवर ते चित्रीत करण्यात आलं आहे. ते कोणत्या सिनेमातलं आहे मला आठवत नाही पण माझं आवडतं गाणं आहे.'
विकीचं मराठी भाषेवरील प्रेम 'छावा' सिनेमानिमित्त अनेकदा दिसून आलं. याशिवाय त्याने सिनेमानंतर रायगडावर जायचीही इच्छाही व्यक्त केली आहे. विकी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अक्षरश: जगला आहे अशी प्रतिक्रिया सध्या सर्व चाहते देत आहेत. 'छावा' हा विकीसाठी त्याच्या करिअरमधील माइलस्टोन ठरु शकतो असा अनेकांचा अंदाज आहे.