ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - बॉलिवूडची शांती म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोणनं रामनवमीच्या पूर्वसंध्येला उत्तराखंडमधील ऋषिकेशच्या घाटावर गंगाआरती केली. यावेळी दीपिकाचे कुटुंबीयही उपस्थित होते. पांढरा कुर्ता आणि शाल परिधान केलेल्या दीपिकानं गंगाघाटावर पूजा अर्चाही केली. यावेळी दीपिकाच्या चेह-यावर एक वेगळीच शांती दिसत आहे. चित्त स्थिर दिसत आहे. यावेळी, गंगाआरतीनंतर दीपिकाने उपस्थितांना गंगा नदी आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचं आवाहनही केलं.
यापूर्वी अमिताभ बच्चन व अनुष्का-विराटनं याठिकाणी भेट दिली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून देश-परदेशात शुटिंगमध्ये व्यस्त असणा-या दीपिकालाही याठिकाणी भेट द्यायची होती. त्या पार्श्वभूमीवर वेळात वेळ काढून तिनं आपल्या कुटुंबीयांसोबत गंगाघाट येथे भेट दिली. ऋषिकेशमध्ये दीपिका राफ्टिंगचा आनंददेखील घेणार असल्याची माहिती आहे.
दीपिका सध्या निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प "पद्मावती" सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात रणवीर सिंह आणि शाहिद कपूरचीही महत्त्वाची भूमिका आहे.
सिनेमामध्ये दाखवण्यात येणा-या इतिहासासंदर्भात काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे संजय लीला भन्साळी यांना अनेक समस्यांना सामोरंही जावं लागलं आहे. राजस्थानमधील राजपूत घराण्यातील राणी पद्मावतीच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. हा सिनेमा इतिहासासोबत छेडछाड करणारा असल्याचा आरोप करत शुटिंगला विरोध केला जात आहे.
कोल्हापुरातील सिनेमाचा सेट जाळला
14 मार्च रोजी भन्साळी यांच्या ‘द लिजंड ऑफ पद्मावती’ या सिनेमाचे पन्हाळ्याजवळील मसाई पठारावर सुरू असलेल्या चित्रीकरणाचा सेट मध्यरात्री अज्ञातांनी पेट्रोल बॉम्बने पेटवून दिला. जमावाने जनरेटर व्हॅनसह पाच वाहनांची तोडफोड करीत सुरक्षारक्षकास मारहाण केली. त्यामध्ये राजू, आवदेश व फैयाज हे कामगार जखमी झाले. आगीमध्ये 700 ते 800 किमती पोशाख, चित्रीकरणाचे साहित्य, असे सुमारे एक कोटीचे नुकसान झाले होते.
जयपूरमध्ये सेटवर तोडफोड
कोल्हापूरपूर्वी जयपूरमधील सिनेमाच्या सेटवर तोडफोड आणि मारहाणीचा प्रकार घडला होता. या प्रकारामुळे संजय लीला भन्साळी यांना तेथील चित्रीकरण थांबवावे लागले होते. राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पद्मावतीच्या सेटवर तोडफोड करून भन्साळी यांना थापड देखील मारली होती. करणी सेनेने याआधीही हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्या ‘जोधा अकबर’ सिनेमालाही विरोध केला होता.