मुसळधार पाऊस आणि धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात होणारा विसर्ग यामुळे कोल्हापूर शहरात महापुराचे अस्मानी संकट ओढवलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून १५ हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लष्करासह, नौदल आणि स्थानिक प्रशासनाकडून जोरदार मदतकार्य सुरू असले तरी महापुराचा विळखा आणि सुरु असलेला तुफान पाऊस यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. या पूरपरिस्थितीचा फटका झी मराठी वाहिनीवरील मालिका तुझ्यात जीव रंगलाला बसला आहे. मंगळवार व बुधवार असं सलग दोन दिवस चित्रीकरण बंद ठेवण्यात आलं आहे. त्यात काल या मालिकेतील कलाकारांनी तिथली परिस्थिती इंस्टा स्टोरीच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दाखवली.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेचं शूटिंग कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील वसगडे या गावात चालू आहे. मात्र मुसळधार पाऊस व धरणांमधून पाण्याच्या मोठ्या प्रमाणातील विसर्गामुळे तिथे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तुझ्यात जीव रंगला मालिकेचं शूटिंगही दोन दिवस रद्द करण्यात आलं आहे.
त्यात कलाकारांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पहायला मिळाला. ज्यात ते भरपाण्यातून वाट काढत चालताना दिसत आहेत. तसेच तिथल्या रहिवाशांना हात दाखविताना या मालिकेतील राणादा म्हणजेच हार्दीक जोशी दिसतो आहे.
खरंतर ते पाण्यातून वाट काढताना मजामस्ती करतानाही दिसले. या मालिकेतील वहिनीसाहेब म्हणजेच धनश्री काडगांवकरदेखील दिसते आहे.