Join us

VIDEO : 'व्हेंटिलेटर'च्या मराठमोळ्या गाण्यातून प्रियांकाची बाबांना साद

By admin | Published: November 03, 2016 1:47 PM

'व्हेंटिलेटर' चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात उतरलेल्या अभिनेत्री प्रियांका चोप्राने चित्रपटात एक मराठी गाणे गायले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - प्रत्येक मुलीच्या आयुष्यात तिच्या बाबांशी असलेलं नातं अतिशय खास आणि तितकंच महत्वाचं असतं. आईशी सगळं मोकळेपणांन बोलता येतं. आईची थोरवीही अनकेदा गायली जाते. पण मुलांसाठी काबाडकष्ट करून, खस्ता खाऊनही बाबा मागेच राहतात. बाप-मुलीचं नात अधोरेखित करणारं एक नव गाणं आलं असून त्याला स्वरसाज दिला आहे बॉलीवूड आणि हॉलिवूडमध्ये धूम उडवणारी ' देसी गर्ल' व 'डॅडीज गर्ल' प्रियांका चोप्राने..  प्रियांकाची निर्मिती असलेला ' व्हेंटिलेटर' या चित्रपटात दिग्गजांची फौज असून उद्या तो प्रदर्शित होत आहे. याच चित्रपटासाठी प्रियांकाने खास मराठीत ' बाबा' हे सुंदर गाणं गायलं असून, त्याचा व्हिडीओ बराच व्हायरला झाला आहे. 
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात बाबा काय असतात , त्यांचं महत्वं नक्की काय? न बोलताही ते कितीतरी गोष्टी समजून घेतात, या आणि अशा अनेक भावना या गाण्यात नेमकेपणाने मांडण्यात आल्या आहेत. एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबतच प्रियांकाही तितकीच उत्तम गायिकाही आहे. आत्तापर्यंत तिने अनेक हिंदी आणि इंग्रजी गाणी गायली आहे. मात्र ' व्हेंटिलेटर'च्या निमित्ताने ती प्रथमच मराठीत गायली असून सर्वांनाच तिच्या गाण्यामुळे एक सुखद धक्का बसला आहे. प्रियांका स्वत:ही तिच्या बाबांच्या अतिशय निकट होती. तिने तिच्या हातावरही ' डॅडीज लिटिल गर्ल' असा टॅटू काढून घेतला आहे. या गाण्यातून तिने तिच्या बाबांनाच एकप्रकारे आदरांजली वाहिली आहे.
राजेश मापुस्कर यांनी दिग्दर्शित केलेला 'व्हेंटिलेटर’ एक फॅमिली ड्रामा असून या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर पुन्हा एकदा अभिनयाकडे वळले आहेत. त्यांच्याशिवाय सतीश आळेकर, जितेंद्र जोशी, सुकन्या कुलकर्णी-मोने, बोमन इराणी यांच्यासह १०० हून अधिक दिग्गज कलाकारांनी चित्रपटात भूमिका केली आहे.