मुंबई - आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे धुमधडाक्यात आगमन होत आहे. देशभरात, विशेषत: महाराष्ट्रात सगळीकडे गणेशोत्सवाचा मोठ्या थाटात जल्लोष साजरा केला जात आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांच्या घरी गणरायाचं आगमन झालं आहे. तर, मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांच्याच घरी बाप्पांचे आगमन उत्साहत झालंय. मुंबईतील सेलिब्रिटीही यात मागे नाहीत. अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन झालं आहे. सेलिब्रिटी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा आनंद शेअर करत आहेत. बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखने यंदाही इको फ्रेंन्डली बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केलीय.
बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये गणरायाच्या आगमनाची मोठी उत्सुकता असते. दबंग सलमान खानच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. यावेळी, सलमानची बहिण अर्पिता आणि आईने बाप्पांचे स्वागत केले. दरम्यान, बाप्पांच्या मूर्तींमध्ये इको फ्रेंन्डली गणपती बाप्पांचीही क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांकडून, पर्यावरण प्रेमींकडून इको फ्रेंडली गणपती बाप्पांची स्थापन करण्यात आलीय. मातीपासून, कागदापासून, नारळांपासून तसेच विविध वस्तू व पदार्थांपासून ह्या मूर्ती बनवण्यात आल्या आहेत.
अभिनेता रितेश देशमुखने यंदा वेगळाच प्रयोग केला आहे. चक्क स्क्रॅप वस्तूंना एकत्रित जोडून रितेश आणि त्याच्या मुलांना यंदाचा इको फ्रेंडली रिसायकल्ड गणपती बनवला आहे. रितेशन या मेकींगचा आणि बाप्पा विराजमान केल्याचा व्हिडिओ सोशळ मीडियातून शेअरही केलाय. ''दरवर्षी आपल्या घरी गणपती येतो, तेव्हा आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. यापूर्वी आम्ही मातीचा गणपती बनवला, पेपर म्हणजे कागदाचाही गणपती बनवला. मात्र, यंदाचा इको फ्रेंडली गणपती बनवताना वेगळीच संकल्पना होती. अर्थात ही कल्पना माझ्या मुलांची होती,'' असे रितेशने सांगितले.
रितेशने मुलांसमवेत रिसायकल गणपती बनवला असून स्क्रॅपमधील साहित्य एकत्र करुन बाप्पांची मूर्ती साकारण्यात आली आहे. अरझान खंबाटा यांनी त्यांच्या वर्कशॉपमध्ये हा रिसायकल्ड गणपती बाप्पा बनवून दिल्याबद्दलही रितेशने त्यांचे आभार मानले आहेत. रितेशने ट्विटरवरुन संपूर्ण प्रकिया सांगितली, तसेच गणपती बनवतानाचा व्हिडिओही शेअर केलाय. व्हिडिओत शेवटी गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती दिसून येत आहे. या मूर्तीसोबत देशमुख परिवार आरती करतानाही पाहायला मिळत आहे. देशमुख परिवाराच्यावतीने सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.