- ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 12 - सैराट सिनेमानंतर अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलेल्या आर्ची (रिंकू राजगुरु) व परश्या (आकाश ठोसर) यांचे मेणाचे पुतळे बनविण्याचे काम जोरात सुरु झालं आहे. हे काम मेणाचे भारतातील पहिले संग्रहालय असलेल्या लोणावळ्यातील सुनिल सेलिब्रेटी वँक्स म्युझियममध्ये युध्दपातळीवर सुरु आहे. वॅक्स कलावंत सुनिल कंडलूर यांनी हे काम सुरु केले असून अवघ्या दिडच दिवसात आर्ची व परश्या यांचे मेणाचे चेहरे तयार करण्यात आले आहेत.
अवघ्या महाराष्ट्राला सैराट करुन सोडलेल्या या जोडीचे लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये हुबेहुब मेणाचे पुतळे बनविण्यात येणार असल्याची बातमी सर्वप्रथम लोकमतने प्रसिध्द केली होती. दिड महिन्यात सैराटच्या या कलाकारांचे मेणाचे पुतळे तयार होतील असा विश्वास कलावंत सुनिल कंडलूर यांनी व्यक्त केला.
सैराट सिनेमातील आर्ची, परश्याची क्रेज अद्यापही कायम असून भारतातील पहिले मेणाचे संग्रहालय असलेल्या लोणावळ्यातील सुनिल सेलिब्रेटी वँक्स म्युझियम मध्ये आर्ची, परश्या व नागराज मंजुळे यांचे मेणाचे पुतळे तयार करण्यात येणार आहे. या संग्रहालयातील वँक्स कलावंत सुनिल कंडलूर यांनी या कलाकारांचे मोजमाप घेतले आहे.
सैराट सिनेमाच्या यशानंतर सध्या आर्ची, परश्यांची क्रेज सर्वत्र वाढली आहे. त्यांना पाहण्यासाठी महाराष्ट्रातील जनता सैराट झाली आहे, अशा कलावंताचे पुतळे संग्रहालयात उभारण्याचा चंग सुनिल कंडलूर यांनी बांधला व कमीत कमी कालावधीत या कलावंतानी देखील याकरिता सहमती दर्शविल्याने पुतळे बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
आर्ची (रिंकू राजगुरु), परश्या (आकाश ठोसर) व नागराज मंजुळे यांच्या हस्तेच या पुतळ्यांचे अनावरण करण्यात येणार असल्याचे सुभाष कंडलूर यांनी सांगितले. सध्या सुनिल सेलिब्रेटी वँक्स म्युझियममध्ये अनेक क्रांतीकारक, सामाजिक कार्यकर्ते, मंत्री, अभिनेते, अभिनेत्री यांचे जवळपास शंभर मेणाचे पुतळे असून रविना टंडन, सोनू सुत, जँकलिन, प्रकाशराज, श्रेया शरण, मि. वर्ल्ड अनुप सिंग ठाकूर, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, थोर समाजसुधारण ज्योतिबा फुले यांचे मेणाचे पुतळे बनविण्याचे काम सुरु आहे.