अभिनेत्री विद्या बालनची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. विद्याचा 2005 मध्ये प्रदर्शित झालेला ‘परिणीता’ हा पहिलाच सिनेमा हिट झाला आणि यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. अर्थात हा सगळा प्रवास विद्यासाठी सोपा नव्हता. कहानी,पा, शकुंतला देवी अशा अनेक सिनेमांत विद्याने एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या. विद्याच्या ‘डर्टी पिक्चर’ या सिनेमाने तर धूम केली. या सिनेमात विद्याने कधी नव्हे इतकी बोल्ड भूमिका साकारली होती. तिचा हा सिनेमा पाहून विद्याच्या आईवडिलाची प्रतिक्रिया काय होती? एका ताज्या मुलाखतीत विद्या यावर बोलली.
तिने सांगितले, ‘डर्टी पिक्चर’चे स्क्रिनिंग होते. मनातून मी खूप घाबरले होते. माझे आईबाबा यांची सिनेमावर काय प्रतिक्रिया असेल, याची मला चिंता होती. आई-बाबा दोघेही सिनेमा पाहायला बसले आणि मी स्क्रिनिंग रूमच्या बाहेर त्यांची वाट पाहत बसले. सिनेमा पाहिल्यानंतर ते दोघेही बाहेर आलेत आणि माझा बाबांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या. मला सिनेमात कुठेही माझी मुलगी दिसली नाही, दिसली ती सिल्क स्मिता, असे म्हणून त्यांनी मला प्रेमाने अलिंगण दिले.
माझी आई मात्र सिनेमा पाहिल्यांनंतर रडत होती. सिनेमात लेक मरताना पाहून ती भावूक झाली होती. तिच्यासाठी हे पाहणे कठीण होते. पण मी साकारलेल्या भूमिकेचा तिला अभिमान होता. तिला मी स्क्रिनवर अजिबात विचित्र वाटले नाही. तिची ही प्रतिक्रिया माझ्यासाठी मोठी कॉम्प्लिमेंट होती.
‘डर्टी पिक्चर’ या सिनेमात विद्या बालनने सिल्क स्मिताची व्यक्तिरेखा साकारली होती. हा सिनेमा सुपरहिट झाला होता. यात विद्यासोबत इमरान हाश्मी आणि नसीरूद्दीन शाह मुख्य भूमिकेत होते.