झिरो फिगरचा ट्रेंड मोडीत काढणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे विद्या बालन (Vidya balan). एखाद्या व्यक्तीचं टॅलेंट त्याच्या शरीराकडे पाहून किंवा पर्सनालिटीकडे पाहून ठरत नाही तर ते त्याच्यातील कलागुणांमुळे ठरतं हे विद्याने सिद्ध करुन दाखवलं. अनेक सिनेमातून विद्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. इतकंच नाही तर अनेकांनी तिला अशुभ म्हणून हिनवलं सुद्धा मात्र, या सगळ्याकडे कानाडोळा करत विद्याने स्वत:ला सिद्ध केलं. अलिकडेच विद्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने बॉलिवूडमधील नेपोटिझम आणि स्टारकिड्स विषयी भाष्य केलं आहे.
विद्याने' इंडियन एक्स्प्रेस'च्या 'एक्सप्रेसो' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासोबत प्रतीक गांधीदेखील हजर होता. या कार्यक्रमात विद्याने इंडस्ट्रीत तिला मिळालेली वागणूक, तिचं करिअर, इंडस्ट्रीमध्ये होणारे मतभेद या सगळ्यावर तिचं मत मांडलं आहे.
नेपोटिझमवर काय म्हणाली विद्या?
"इंडस्ट्रीमध्ये कधी पक्षपातीपणाचा सामना करायला लागला का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावर तिने स्पष्टपणे तिचं मत मांडलं. नेपोटिझम असो किंवा नसो पण आज मी इथे आहे. इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही. जर तसं असतं तर आज प्रत्येक बापाचा मुलगा आणि प्रत्येक बापाची मुलगी यशस्वी असते (थोडक्यात, सगळेच स्टारकिड्स यशस्वी झाले असते)," असं विद्या म्हणाली.
पुढे ती म्हणते, "मी तीन वर्ष हार्टब्रेकमधून जात होते. सतत मला नकार मिळत होते आणि या सगळ्याचा मला त्रास होत होता. मी अक्षरश: उद्धवस्त झाले होते. त्यामुळे या क्षेत्रात काम करायची माझी इच्छा संपली होती. पण, मनात कुठे तरी एक प्रबळ इच्छा होती की. काही तरी करायचंय आहे आणि मनातली ती धकधक या नकारांपेक्षा खूप मोठी होती."
दरम्यान, विद्याचा 'दो और दो प्यार' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता प्रतीक गांधी याने स्क्रीन शेअर केली आहे. तसंच इलियाना डिक्रूझ, सेंधील राममूर्ती ही कलाकार मंडळीदेखील या सिनेमात आहेत. हा सिनेमा १९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.